पंजाबी गायिका यशिंदर कौरची हत्या? अपहरणानंतर कालव्यात सापडला मृतदेह

बंदुकीच्या धाकावर अपहरण केल्याचा आरोप
कॅनडास्थित आरोपीसह दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पंजाबी गायिका यशिंदर कौर उर्फ इंदर कौर हिचा मृतदेह लुधियानाजवळील नीलॉन कालव्यात सापडल्याने खळबळ उडाली आहे. पाच दिवसांपूर्वी बंदुकीच्या धाकावर तिचे अपहरण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. पोलिसांनी तिची रक्ताचे डाग असलेली कारही जप्त केली असून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणात कॅनडास्थित मुख्य आरोपीसह त्याच्या वडिलांवर आणि मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.


लुधियाना : पंजाबी गायिका यशिंदर कौर उर्फ इंदर कौर हिचा मृतदेह नीलॉन कालवा परिसरातून सापडल्याने पंजाबमध्ये खळबळ उडाली आहे. 29 वर्षीय गायिकेचे काही दिवसांपूर्वी बंदुकीच्या धाकावर अपहरण झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी पोलिसांकडे दिली होती.

मंगळवारी कुबा गावाजवळील कालव्यातून महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. याच परिसरातून पोलिसांनी तिची फोर्ड फिगो कार जप्त केली असून त्यामध्ये रक्ताचे डाग आढळले आहेत.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, महिलेची हत्या कारमध्ये करण्यात आली आणि त्यानंतर मृतदेह कालव्यात फेकण्यात आला असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

या प्रकरणात मोगा येथील सुखविंदर सिंग उर्फ सुखा, त्याचे वडील प्रीतम सिंग आणि मित्र करमजीत सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी सुखविंदर सध्या कॅनडामध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी 29 एप्रिल रोजी नेपाळमार्गे भारतात आला होता आणि 13 मे रोजी परत गेला. याच दिवशी गायिकेचे अपहरण झाल्याचा आरोप आहे.

दरम्यान, पोलिसांनी आरोपीचे वडील प्रीतम सिंग आणि मित्र करमजीत सिंग यांना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मृत गायिकेचा भाऊ ज्योतिंदर सिंग याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 13 मे रोजी रात्री यशिंदर किराणा खरेदीसाठी घराबाहेर पडली होती. मात्र ती परत आली नाही. तिचा मोबाईलही बंद लागत होता.

कुटुंबीयांनी शोध घेतल्यानंतर आरोपींनी मुंडियन कलान परिसरातून बंदुकीच्या धाकावर तिचे अपहरण केल्याची माहिती समोर आली.

पोलिसांनी सांगितले की, यशिंदर आणि मुख्य आरोपी सुखविंदर यांच्यात पूर्वी संबंध होते. मात्र काही कारणांमुळे दोघे वेगळे झाले होते. यशिंदरने लग्नास नकार दिल्यानंतर आरोपींनी हे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.