फाल्टा मतदारसंघात मोठा ट्विस्ट! TMC उमेदवार जहांगीर खान यांची निवडणुकीतून माघार

फाल्टाच्या विकासासाठी घेतल्याचा दावा
मतदानाआधी बंगालच्या राजकारणात खळबळ

पश्चिम बंगालमधील फाल्टा विधानसभा मतदारसंघात मतदानापूर्वी मोठी राजकीय घडामोड घडली आहे. तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली. फाल्टाच्या विकासासाठी विशेष पॅकेज जाहीर झाल्यानंतर हा निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे. या घोषणेमुळे बंगालच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपही रंगले आहेत.


फाल्टा : पश्चिम बंगाल मधील फाल्टा विधानसभा मतदारसंघात मतदानापूर्वी मोठा राजकीय धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांनी मंगळवारी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असल्याची घोषणा केली.

पत्रकार परिषदेत बोलताना जहांगीर खान यांनी हा निर्णय फाल्टा मतदारसंघाच्या विकासासाठी घेतल्याचे सांगितले. “मी फाल्टाचा मुलगा आहे आणि मला या भागात शांतता तसेच विकास हवा आहे,” असे ते म्हणाले.

त्यांनी पुढे सांगितले की, मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी फाल्टाच्या विकासासाठी विशेष पॅकेज जाहीर केल्याने त्यांनी मतदान प्रक्रियेपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे.

दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील या मतदारसंघात 21 मे रोजी मतदान होणार आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ही घोषणा करण्यात आली. त्याचवेळी भाजप उमेदवार देबांगशु पांडा यांच्या समर्थनार्थ रोड शो आयोजित करण्यात आला होता.

दरम्यान, सुवेंदू अधिकारी यांनी दावा केला की जहांगीर खान यांच्याकडे मतदानासाठी आवश्यक पोलिंग एजंट नसल्याने त्यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला. “त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता,” असे अधिकारी यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले.

याआधी कलकत्ता उच्च न्यायालयाने जहांगीर खान यांना त्यांच्याविरुद्ध दाखल फौजदारी प्रकरणांमध्ये 26 मेपर्यंत कोणतीही सक्तीची पोलिस कारवाई न करण्याचे संरक्षण दिले होते.

भारत निवडणूक आयोगाने 2 मे रोजी फाल्टा विधानसभा मतदारसंघात फेरमतदानाची घोषणा केली होती. 29 एप्रिल रोजी झालेल्या मतदानावेळी गैरव्यवहार आणि मतदान केंद्रांवरील अनधिकृत उपस्थितीबाबत गंभीर आरोप करण्यात आले होते.

फाल्टा मतदारसंघातील सर्व 285 मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान होणार असून 24 मे रोजी मतमोजणी केली जाणार आहे.