वेंगुर्ले : प्रतिनिधी : मान्सून २०२६ चा खरीप भातपिक हंगाम तोंडावर आलेला आहे. तरी सुद्धा शासनाच्या कृषी खात्यामार्फत सेवा सोसायटींच्या माध्यमातून जो बियाण्यांचा पुरवठा केला जातो तो अद्यापपर्यंत झालेला नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. ज्या सेवा सोसायटींना शेतकऱ्यांना बियाणे व खते विक्रेचे परवाने शासनामार्फत देण्यात आलेले आहेत. त्या सोसायटींमार्फत खरीप हंगामासाठी बियाणे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटना व शेतकरी यांच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष शामसुंदर राय यांनी केली आहे. तसेच याबाबत त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासह तालुका कृषी अधिकाऱ्यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.
राय यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, मान्सूनपूर्वी बरेच शेतकरी दुर्गम भागातील शेतकरी खत नेऊन ठेवत असतात. काही ठिकाणी पावसाळ्यात वाहतुकीचा प्रश्न उद्भवत असल्यामुळे शेतकरी खतपुरवठा हा पहिलाच नेऊन ठेवतात. त्याचप्रमाणे पहिलाच पाऊस लागल्यानंतर व थोडीफार जमीन ओली झाल्यावर नदीलगतची भात बियाणे पेरली जातात. परंतु अद्यापपर्यंत शासनाकडून भात बियाणे उपलब्ध नसल्यामुळे तसेच नदी लगत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना आताच भात बियाणे पेरुन (म्हणजेच) थोड्या फार भिजलेल्या (भिजवणीवर) भात पेरले जाते. नदीपात्र भरुन जाण्यापूर्वी त्याची रोपे काढावी लागतात. त्यामुळे जर वेळीच बियाणे व खते ही जर शेतकऱ्यांना मिळाली तर योग्य वेळी त्याची लागवड करता येईल. त्यामुळे तात्काळ बियाणे व खते शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी राय यांनी केली आहे.












