मैत्रिणीशी केलेल्या इंस्टाग्राम चॅटमुळे प्रकरणाला नवे वळण
सासरकडून मानसिक आणि शारीरिक त्रास होत असल्याचा आरोप
भोपाळमधील ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. तिच्या मृत्यूपूर्वीचे काही सीसीटीव्ही फुटेज आणि सोशल मीडियावरील चॅट समोर आल्यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. ट्विशाने आपल्या मैत्रिणीशी केलेल्या संभाषणात लग्नानंतर ती मानसिकदृष्ट्या त्रस्त असल्याचे सांगितले होते. तसेच सासरच्या मंडळींकडून छळ होत असल्याचाही उल्लेख तिने केला होता. या सर्व माहितीमुळे पोलिस तपास अधिक वेगाने सुरू असून नेमके काय घडले याबाबत चर्चा वाढली आहे.
भोपाळ : ट्विशा शर्मा हिच्या संशयास्पद मृत्यूमुळे मोठी खळबळ उडाली आहे. तिच्या मृत्यूपूर्वीचे दोन सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर या प्रकरणाची चर्चा अधिक वाढली आहे. त्याचबरोबर ट्विशाने तिच्या मैत्रीण मीनाक्षी हिच्याशी केलेले इंस्टाग्राम चॅट देखील समोर आले आहे. या संवादामध्ये ट्विशाने लग्नानंतर आपण खूप त्रस्त असल्याचे सांगितले होते.
ट्विशाने मैत्रिणीला केलेल्या संदेशात, “मी फसले यार… तू फसू नकोस” असे म्हटले होते. तसेच योग्य वेळ आल्यावर सर्व काही सांगेल, असेही तिने नमूद केले होते. तिच्या या संदेशांमधून ती मानसिक तणावात असल्याचे स्पष्ट होत असल्याची चर्चा सुरू आहे. मीनाक्षीने देखील ट्विशाबद्दल चिंता व्यक्त करत तिला आधार देण्याचा प्रयत्न केला होता.
याशिवाय ट्विशाचे काही व्हॉट्सअॅप चॅट देखील समोर आले आहेत. त्यामध्ये तिने आपल्या आईला आपण खूप त्रस्त असल्याचे सांगितले होते. सासरच्या मंडळींकडून मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचा आरोपही तिने केला होता. तसेच तिच्यावर संशय घेतला जात असल्याचेही तिने संदेशात नमूद केले होते. “हे लोक मला जगू देत नाहीत,” असेही तिने लिहिल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2025 मध्ये ट्विशाचा विवाह समर्थ सिंह याच्यासोबत झाला होता. समर्थ हा पेशाने वकील असून त्याची आणि ट्विशाची ओळख मॅट्रिमोनियल साइटच्या माध्यमातून झाली होती. सुरुवातीला सर्व काही व्यवस्थित होते. मात्र काही दिवसांनंतर ट्विशाला मानसिक आणि शारीरिक त्रास सुरू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
लग्नानंतर काही महिन्यांतच ट्विशाचा गर्भपात झाल्याचेही सांगितले जात आहे. त्यानंतर तिची अवस्था अधिक खालावली होती, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. १२ मे २०२६ रोजी ट्विशाचा मृतदेह आढळून आला होता. शवविच्छेदन अहवालात गळफास घेतल्याचे समोर आले असले तरी शरीरावर जखमांचे काही निशाण असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ट्विशाच्या मृत्यूमागे नेमके काय कारण होते, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.










