माखजन चे सरपंच महेश बाष्टे यांचा आरोप
मूल्यांकनाची माहितीच्या अधिकारात मागवली माहिती
गौरव पोंक्षे माखजन:
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सन २०२५-२६ अंतर्गत संगमेश्वर तालुक्यातील झालेले मूल्यांकन हे पक्षपाती पणाने राबवल्याचा आरोप माखजन चे सरपंच महेश बाष्टे यांनी केला आहे.
संगमेश्वर तालुक्यात ज्या सहा ग्रामपंचायतींचे मूल्यांकन झाले व तपासणी समितीने तपासणी केली ती सर्व माहिती व पुरावे सहिसूद नक्कल मिळावे यासाठी माखजन चे सरपंच महेश बाष्टे यांनी जन माहिती अधिकारी तथा गटविकास अधिकारी (गट – अ) पंचायत समिती संगमेश्वर यांचेकडे केली आहे.३० एप्रिल रोजी माहिती च्या अधिकारात अर्ज केला होता.परंतु अद्याप माहिती मिळाली नसल्याची माहिती सरपंच महेश बाष्टे यांनी पत्रकाराना दिली.
दरम्यान संगमेश्वर तालुक्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात माखजन,आंबव पोंक्षे,कडवई,चोरवणे, आंबेड बुद्रुक,ओझरे खुर्द आदी सहा ग्रामपंचायती स्पर्धेत होत्या.महेश बाष्टे यांनी सांगितल्यानुसार माखजन ग्रामपंचायती अंतर्गत झालेल्या मूल्यांकनात ज्या गोष्टींसाठी गुण घेतले गेले त्या सर्व गोष्टी वास्तवात आहेत,त्याचं कागदावर आहेत.परंतु काही अन्य गावात ही वस्तुस्थिती नसल्याची माहिती महेश बाष्टे यांनी दिली.
संगमेश्वर तालुक्यातून चोरवणे ग्रामपंचायत प्रथम व ओझरे खुर्द द्वितीय आल्याची माहिती मिळत असल्याचे महेश बाष्टे यांनी पत्रकारांना सांगितले.मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात गुणादानासाठी असलेली प्रमाणके,मानदंड प्रत्येक ग्रामपंचायतीने कशाप्रकारे पूर्ण केली?व गुणादान कशाप्रकारे करण्यात आले? याविषयी सरपंच महेश बाष्टे यांना शंका असल्याचे त्यांनी सांगितले.ह्या मागची सर्व वास्तविकता माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीतच कळू शकेल असे सांगितले.
येत्या १६ ऑगस्ट ला माखजन ग्रामपंचायत अमृतमहोत्सवी वर्षात प्रवेश करत आहे.मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठी माखजन ग्रामपंचायती ने चांगली तयारी केली होती.गावातील लक्षवेधी सोयीसुविधा,गतिमान कारभार,एसटी बस्थानकाचे सुशोभीकरण,आदर्श अशी माखजन मराठी शाळा,स्वच्छ बाजारपेठ,बाजारपेठेत स्वछता गृहांची सोय ,पथदीप,कचरा व्यवस्थापन,रस्ते,पाणी आणि शासकीय योजनांची सुरु असलेली प्रभावी अंमलबजावणी यामुळे माखजन ग्रामपंचायतीकडे सध्या पाहिलं जात आहे.पण या स्पर्धेत निकषानुसार पूर्तता असून देखील नंबर न आल्याने महेश बाष्टे यांनी या मूल्यांकनावर नाराजी व्यक्त केली आहे.












