चिपळूणात सदनिकाफोडी सुमारे ४ लाखांचे दागिने लंपास; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

चिपळूण (प्रतिनिधी):- शहरातील पाग गोपाळकृष्णवाडी येथील सदनिका अज्ञात चोरट्याने फोडून सुमारे ४ लाख १५- हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले आहेत. या घटनेने पाग परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना दिनांक १२ मे रोजी दुपारी २.३० ते १९ मे रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबतची फिर्याद डॉ. सागर वसंतराव पाटील (३९, मधुबन पार्क सदनिका नंबर २०७, पाग गोपाळकृष्णवाडी चिपळूण यांनी दिली आहे. यानुसार डॉ. सागर पाटील यांच्या मालकीची सदनिका कुणीतरी अज्ञात चोरट्याने कोणत्यातरी हत्याराने मुख्य दरवाजाचे कुलूप कडीकोयंडा तोडून आत मध्ये प्रवेश करून बेडरूममधील असलेल्या लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडून आतमध्ये असलेले लॉकर तोडून सुमारे ४ लाख १५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व चांदीची भांडी लंपास केली आहेत. यामध्ये मंगळसूत्र ८५ हजार रुपये किंमतीचे, सोन्याची चेन ६० हजार रुपये किंमतीची, अंगठ्या ४० हजार रुपयांची किंमतीच्या, लहान बाळाच्या ८ हजार रुपये किंमतीच्या अंगठ्या, सोन्याच्या बांगड्या ३० हजार रुपये किंमतीच्या, सोन्याचे वेढण ६० हजार रुपये किंमतीचे, सोन्याचे ६० हजार रुपये किंमतीचे कोईन, चांदीची समई, कुबेराची मूर्ती, ४० हजार रुपये किंमतीचे, कर्णफुले ३० हजार रुपयांचे, २ हजार रुपयांची ठुशी असा ऐवज चोरीस गेला आहे.

याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.