शाश्वत भविष्यासाठी ‘नैसर्गिक शेती’ हाच एकमेव पर्याय!

मसुरे |झुंजार पेडणेकर

भारत हा कृषिप्रधान देश असून देशातील ७०% जनता शेती व शेतीपूरक व्यवसायांवर अवलंबून आहे. हरितक्रांतीनंतर देशात शेती उत्पादन वाढले खरे, पण रासायनिक खते, कीटकनाशके आणि तणनाशके यांच्या असंतुलित वापरामुळे मातीचे आरोग्य धोक्यात आले आहे. अन्न आणि पाणी दूषित होत असून मानवी आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम होत आहेत. अशा स्थितीत रासायनिक अवशेषमुक्त अन्नाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी ‘नैसर्गिक शेती’ हा एक उत्तम शाश्वत पर्याय असल्याचे कृषि विज्ञान केंद्र किर्लोस सिंधुदुर्गचे विषय विशेषज्ञ डॉ. विलास यशवंत सावंत सांगतात. नैसर्गिक शेती संदर्भात किर्लोस कृषी विज्ञान केंद्र राबवित असलेल्या विविध जनजागृती कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती डॉ विलास सावंत यांनी दिली आहे.

▪️नैसर्गिक शेती म्हणजे काय?

नैसर्गिक शेती ही पूर्णपणे रसायनमुक्त, पर्यावरणपूरक आणि सहजीवन पद्धतीवर आधारित शेती प्रणाली आहे. या पद्धतीचा मुख्य पाया ‘देशी गाय’ हा आहे. यात शेतीच्या आसपास उपलब्ध असणाऱ्या नैसर्गिक संसाधनांचा आणि स्थानिक निविष्ठांचा वापर केला जातो. रासायनिक खते किंवा कीटकनाशके न वापरता आंतरपिकांच्या माध्यमातून जैवविविधतेचे संवर्धन केले जाते, ज्यामुळे शेतीचा खर्च कमी होऊन शेतकऱ्यांचा नफा वाढतो.

▪️सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती मधील फरक

अनेकदा सेंद्रिय (Organic) आणि नैसर्गिक शेती (Natural Farming) या दोन्ही संकल्पना समान मानल्या जातात, परंतु यात मुख्य फरक आहे. सेंद्रिय शेतीमध्ये काही जैविक खते किंवा कीटकनाशके बाजारातून विकत आणून वापरण्यास मुभा असते. तसेच यासाठी ‘PGS’ किंवा ‘NPOP’ सारख्या प्रमाणीकरणाची गरज असते. याउलट, नैसर्गिक शेतीमध्ये शेताबाहेरील कोणत्याही निविष्ठा वापरल्या जात नाहीत. यात देशी गाईचे शेण, गोमूत्र आणि वनस्पतीजन्य अर्कांचा वापर करून घरच्या घरीच निविष्ठा तयार केल्या जातात.

▪️नैसर्गिक शेतीचे मुख्य आधारस्तंभ आणि तंत्रज्ञान

देशी गाय: ५ एकर क्षेत्रासाठी किमान एक देशी गाय आवश्यक आहे. तिच्या शेणात आणि गोमूत्रात जमिनी सुपीक करणारे असंख्य उपयुक्त सूक्ष्म जीवाणू असतात.

देशी गांडूळ: गांडूळ जमिनीत खोलवर छिद्रे करून हवा खेळती ठेवतात. त्यामुळे मुळांना प्राणवायू मिळतो आणि जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.

आच्छादन (Mulching): मातीचे, पिकांच्या अवशेषांचे किंवा सजीव पिकांचे आच्छादन केल्याने बाष्पीभवन कमी होऊन पाण्याची बचत होते. तसेच यामुळे जमिनीमध्ये ‘वाफसा’ स्थिती निर्माण होते.

वाफसा स्थिती: जमिनीतील मातीच्या दोन कणांमध्ये ५०% पाण्याची वाफ आणि ५०% हवा असणे म्हणजे वाफसा स्थिती होय. पिकांच्या वाढीसाठी ही स्थिती अत्यंत पोषक असते.

▪️जीवामृत व घनजीवामृत निर्मिती

जीवामृत: १० किलो देशी गाईचे शेण, ५ लिटर गोमूत्र, १ किलो गूळ, १ किलो कडधान्याचे पीठ आणि पाव किलो जंगलातील माती २०० लिटर पाण्यात मिसळून हे द्रावण तयार केले जाते. हे एकरी २०० लिटर या प्रमाणात महिन्यातून दोनदा सिंचनाच्या पाण्यातून दिले जाते.

घनजीवामृत: २०० किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतावर २० लिटर जीवामृत शिंपडून ते सावलीत ४८ तास झाकून ठेवले जाते. किण्वन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर हे खत वाळवून एकरी २०० किलो या प्रमाणात वापरतात.

▪️सरकारी योजना आणि मिशन

नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारद्वारे विविध योजना राबवल्या जात आहेत:

केंद्र पुरस्कृत: परंपरागत कृषि विकास योजना (PKVY), राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन (NMNF).

राज्य पुरस्कृत: डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन.

या योजनांद्वारे गाव पातळीवर शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्या (FPOs) स्थापन करून जैविक निविष्ठा संसाधन केंद्रे उभारली जात आहेत.

▪️नैसर्गिक शेती काळाची गरज

जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण सध्या ०.४% पेक्षा कमी झाले आहे, जे किमान १% असणे आवश्यक आहे. नैसर्गिक शेतीमुळे जमिनीचे आरोग्य सुधारते, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होतो आणि ग्राहकांना सकस, विषमुक्त अन्न मिळते. म्हणूनच, शाश्वत भविष्यासाठी शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीची कास धरणे ही आजच्या काळाची मोठी गरज आहे असे डॉ. विलास सावंत सांगतात.