संगमेश्वर : राजापूर शहराजवळील कोदवली साईनगर पुनर्वसन वसाहतीतील हॉटेल फुडलँन्डमध्ये घडलेल्या संशयास्पद प्रकारानंतर आता संगमेश्वर तालुक्यातही अशाच पद्धतीची चोरीची घटना उघडकीस आली आहे. राजापुरातील घटनेतील संशयितांची गाडी तुरळ, संगमेश्वर परिसरात आढळून आल्यानंतर ही घटना घडल्याने दोन्ही प्रकरणांमध्ये काही संबंध आहे का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
राजापुरातील हॉटेल फुडलँन्डमध्ये चार अज्ञात इसमांनी रूम पाहण्याच्या बहाण्याने प्रवेश केला होता. यावेळी हॉटेलमधील ग्राहक नोंदणी रजिस्टरसह त्यामध्ये ठेवलेली सुमारे ६ हजार रुपयांची रोकड लांबविल्याचे समोर आले असून, याप्रकरणी राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांचा वावर सीसीटीव्हीमध्येही कैद झाला होता.
दरम्यान, संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथील श्रद्धा हॉटेल अँड लॉजमध्ये सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास तीन अज्ञात इसम आले. त्यापैकी एक जण वाहनात थांबला, तर दोघांनी रूम पाहण्याचा बहाणा करत लॉजमध्ये प्रवेश केला. यातील एका इसमाने व्यवस्थापकाला बोलण्यात गुंतवून ठेवले असताना दुसऱ्याने काऊंटरमधील रजिस्टर व सुमारे ५ हजार ५०० रुपयांची रोकड चोरून नेल्याची तक्रार दाखल झाली आहे. चोरीनंतर संशयित एमएच-केए-५१/एमजी-६९०५ क्रमांकाच्या वाहनातून पसार झाल्याचे समोर आले आहे.
राजापूर आणि संगमेश्वर या दोन्ही ठिकाणी हॉटेलमध्ये रूम पाहण्याचा बहाणा, ग्राहक नोंदणी रजिस्टर लंपास करण्याची पद्धत आणि संशयितांच्या हालचाली यामुळे पोलिस तपास अधिक गतीने सुरू असून, या दोन्ही घटनांमधील दुवा शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.













