स्नेह नागरी पतसंस्थेत ‘जागतिक सहकार दिन’ उत्साहात
सावंतवाडी । प्रतिनिधी : सहकार क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा ग्राहकांशी असलेला संवाद आणि संपर्क अत्यंत महत्त्वाचा असतो. आपले बोलणे नम्र, स्पष्ट आणि गोड असावे. ग्राहकाला आपला देव समजून त्यांच्याशी आदराने वागायला हवे. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मनात संस्थेबद्दल आपुलकी, तळमळ आणि कार्यतत्परता असणे गरजेचे आहे. संस्थेची जशी प्रगती होईल, तसा कर्मचाऱ्यांनाही त्याचा उत्तम मोबदला नक्कीच मिळेल. दरम्यान, स्नेह पतसंस्थेने यशस्वी २६ वर्षे पूर्ण केली असून जनमानसात या संस्थेबद्दल मोठा विश्वास व आदर आहे, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोजक्या उत्तम पतसंस्थांमध्ये स्नेह पतसंस्थेची गणना होते, अशा शब्दांत जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ यांनी स्नेह पतसंस्थेचा गौरव केला.
स्नेह नागरी सहकारी पतसंस्थेत जागतिक सहकार दिनाचे औचित्य साधून पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांसाठी ‘सहकार मेळावा’ अत्यंत उत्साहात संपन्न झाला. ४ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात सहकार क्षेत्रातील नामवंत मार्गदर्शक, सैनिक पतसंस्था व सिंधुदुर्ग जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात सुनील राऊळ यांनी कर्मचाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी स्नेह पतसंस्थेच्या मुख्याधिकारी सौ. संगीता प्रभू यांनीही कर्मचाऱ्यांना संबोधित केले. “ग्राहक हाच आपल्यासाठी राजा आहे आणि त्याचा कायम आदर राखला पाहिजे. संस्थेच्या विश्वासार्हतेची माहिती जनमानसांपर्यंत पोहोचवणे आणि प्रत्येकाने आपले काम सर्वोत्तम पद्धतीने करणे हे आपले कर्तव्य आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
स्नेह पतसंस्थेचे अध्यक्ष अनंत व्यंकटेश उचगावकर यांनी आपल्या भाषणात ‘सहकारातून समृद्धी’ या संकल्पनेचा सविस्तर खुलासा केला. ते म्हणाले, “सहकारातून समृद्धी ही केवळ ग्राहकांचीच नव्हे, तर कर्मचारी वर्गाचीही झाली पाहिजे. आपले पगार सरकारी बँकेच्या धर्तीवर व्हावेत यासाठी कर्मचाऱ्यांनी अतिशय प्रामाणिकपणे कष्ट केले पाहिजेत. उत्तम संभाषणाद्वारे ठेवी वाढवणे, चांगल्या कर्जदारांचा शोध घेऊन त्यांना संस्थेशी जोडणे आणि त्यांच्या मनात संस्थेबद्दल विश्वास निर्माण करणे आवश्यक आहे. प्रेमभाव आपल्या घरी आणि समाजात निर्माण करून संस्थेची व स्वतःची प्रगती साधावी.”
कार्यक्रमाच्या शेवटी, प्रमुख पाहुणे सुनील राऊळ साहेब यांचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन स्नेह पतसंस्थेच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला. तसेच मेळाव्याला उपस्थित असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. आभार सौ संगीता प्रभू यांनी मानले.













