​शिरशिंगे येथे ग्रामस्थांनी उधळून लावली जमीन मोजणी

भूमी अभिलेखचे अधिकारी परतले रिकाम्या हाती!

​दलाल आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने सामाईक जमीन हडपण्याचा डाव : ग्रामस्थांचा आरोप

​सावंतवाडी :
तालुक्यातील ‘मिनी काश्मीर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरशिंगे गावातील जैवविविधतेने नटलेली अब्जावधी रुपयांची सामाईक जमीन हडपण्याचा मोठा डाव काही धनाढ्य दलाल आणि महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुरू असल्याचा खळबळजनक आरोप ग्रामस्थांनी केला होता. या पार्श्वभूमीवर, आज २० मे रोजी भूमी अभिलेख विभागाकडून होणारी जमीन मोजणी शिरशिंगे येथील ग्रामस्थ, तरुण आणि चाकरमान्यांनी एकत्र येत तीव्र विरोधासह उधळून लावली. “आमच्या पूर्वजांची संपत्ती कुणाच्या घशात घालू नका,” असा संतप्त इशारा यावेळी ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला.

​ भू-माफियांनी महसूल विभाग आणि संबंधित खात्यातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून गरीब, अशिक्षित शेतकऱ्यांना पैशांचे आमिष दाखवले आहे. त्यांच्या गरिबीचा गैरफायदा घेत ही सामाईक जमीन राजरोसपणे खरेदी केली जात आहे. महसूल खात्याकडून ही खरेदीखते नोंदवताना इतर कोणत्याही कायदेशीर सहभागधारकांना किंवा सहधारकांना कोणतीही पूर्वसूचना अथवा कायदेशीर नोटीस देण्यात आलेली नाही. नियम धाब्यावर बसवून ही खरेदीखते मारली जात असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी यापूर्वीच तहसीलदारांना निवेदन दिले होते व ही मोजणी थांबवण्याची मागणी केली होती.

​ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा आणि
आज भूमी अभिलेखचे अधिकारी मोजणीसाठी गावात दाखल झाले असता, ग्रामस्थ मोठ्या संख्येने गोळा झाले आणि त्यांनी मोजणीची प्रक्रिया बंद पाडली. याप्रसंगी बोलताना ग्रामस्थ नारायण राऊळ यांनी सांगितले की, शिरशिंगे गावची जमीन धडे वाटप न करता विकण्याचा घाट घातला जात असून, याला आम्ही सर्वजण एकमताने विरोध करू. तर, धनदांडग्या व्यक्तींसह भ्रष्ट अधिकाऱ्यांनी आखलेला हा डाव आम्ही ग्रामस्थांची वज्रमूठ दाखवून हाणून पाडू, असा इशारा पांडुरंग राऊळ यांनी दिला.

​जमीन राहिली तर गाव आणि मंदिर राहील: सरपंच दीपक राऊळ
शिरशिंगे गावचे सरपंच दीपक राऊळ यांनी ग्रामस्थांना आवाहन करताना सांगितले की, “आमच्या पूर्वजांनी ही सामाईक जागा मोठ्या कष्टाने राखली आहे. ती आम्ही कोणत्याही परिस्थितीत विकू देणार नाही. गावाबाहेरील व्यक्तींना जमीन विकू नका; जमीन राहिली तर गाव, मंदिर आणि आपले गावपण राहील. ग्रामस्थांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये.” तसेच शासनाने चुकीच्या पद्धतीने काम करू नये, अशी मागणीही त्यांनी केली.

​अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया
ग्रामस्थांच्या तीव्र विरोधामुळे भूमी अभिलेख अधिकाऱ्यांना मोजणी न करताच रिकाम्या हाती परत जावे लागले. या संदर्भात माहिती देताना भूमी अभिलेख अधिकाऱ्यांनी सांगितले की, अर्जदार तारक आरोलकर यांनी मोजणीसाठी पैसे भरले होते. त्यानुसार आगाऊ नोटिसा काढून आम्ही प्रत्यक्ष गावात उपस्थित झालो होतो. मात्र, जमिनीचे अद्याप अधिकृत वाटप झालेले नाही, तसेच सर्वांना नोटिसा मिळालेल्या नाहीत, असे सांगत ग्रामस्थांनी लेखी म्हणणे सादर केले व मोजणीला कायमचा विरोध दर्शवला. त्यामुळे मोजणी न करताच परत फिरणे भाग पडले.

​ग्रामस्थांचा हा तीव्र रोख पाहता, आगामी काळात शिरशिंगे गावातील या संवेदनशील जमिनीच्या वादाबाबत स्थानिक प्रशासन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.