कृषीदूतांचे वहाळ येथे उत्साहात स्वागत

 ‘ग्राम संलग्नावस्था परिचय कार्यक्रमाचे’ आयोजन
चिपळूण (वार्ताहर) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत असलेल्या गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण येथील बी.एस्सी. (कृषी) शाखेच्या अंतिम वर्षाच्या कृषीदूतांनी ‘ग्रामीण कृषी कार्यानुभव’ (RAWE) कार्यक्रमांतर्गत वहाळ येथे ग्राम संलग्नावस्था परिचय कार्यक्रम अत्यंत उत्साहात आयोजित केला होता. यावेळी गावकऱ्यांनी सर्व कृषीदूतांचे गावात उत्साही स्वागत केले.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर कृषीदूतांनी उपस्थित गावकऱ्यांना या संपूर्ण उपक्रमाचा मुख्य उद्देश आणि आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. आधुनिक तंत्रज्ञान व नाविन्यपूर्ण उपक्रम कृषीदूतांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना स्पष्ट केले की, या उपक्रमांतर्गत वहाळगावातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेती करण्याच्या नवीन आणि प्रगत पद्धतींची माहिती देणे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा व AI चा वापर कसा करावा, याचे मार्गदर्शन करणे. शेतकऱ्यांसाठी विशेष कृषी मेळाव्याचे आयोजन करणे, गावातील लहान मुलांसाठी खेळ व नवीन गोष्टी शिकण्यासाठी विविध उपक्रम राबवणे , शेतीविषयक अद्ययावत माहिती मिळवून देणाऱ्या विविध नवीन मोबाईल ॲप्सचा वापर कसा करावा, याचे प्रात्यक्षिक गावकऱ्यांना दाखवणे.या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे वहाळगावातील शेतकऱ्यांना शेतीविषयक अद्ययावत माहिती मिळून त्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ होण्यास नक्कीच मदत होईल, असा विश्वास कृषीदूतांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर व शेतकऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले व त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून वहाळ गावचे सरपंच मंगेश शेलार, उपसरपंच आनंदा सकपाळ, ग्रामसेवक बजरंग हराळे व इतर शासकीय कर्मचारी उपस्थित होते, ज्यांनी विद्यार्थ्यांना मोलाची साथ व मार्गदर्शन दिले. कार्यक्रमाच्या शेवटी कृषीदूत कु. अंकुश नारखेडे याने उपस्थित सर्वांचे आभार मानले. हा संपूर्ण उपक्रम कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे, उपप्राचार्य बाळासाहेब सूर्यवंशी, आणि ग्रामीण कृषी कार्यानुभव समन्वयक प्रा. प्रशांत इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे राबविण्यात येत आहे.