ट्रकसह मुद्देमाल ताब्यात
बांदा : प्रतिनिधी
मुंबई – गोवा महामार्गावर इन्सुली पोलीस तपासणी नाक्यावर नियमित वाहन तपासणी दरम्यान गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर पोलिसांनी कारवाई करत एकूण १० लाख २३ हजार ४६० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी ट्रक चालक अमित अनंत भोसले (वय ४२, रा. पेडवेवाडी, संगमेश्वर रत्नागिरी) याला ताब्यात घेण्यात आले.
इन्सुली चेकपोस्टवर पोलीस कॉन्स्टेबल राकेश चव्हाण व श्री. हेरलेकर हे ड्युटीवर असताना नियमित वाहन तपासणी करत होते. त्यावेळी ट्रक क्रमांक (एमएच ०८ डब्लू ११२२) संशयास्पद आढळल्याने त्याची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान ट्रकमध्ये गोवा बनावटीची दारू आढळून आली.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे यांनी घटनास्थळी येत पुढील कारवाई केली. यावेळी ट्रकमधून २३ हजार ४६० रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू आणि अंदाजे १० लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण १० लाख २३ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (अ)(ई) अंतर्गत पोलीस कॉन्स्टेबल राकेश चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. असून पुढील तपास सुरू आहे.
———–













