१५ गावे आणि ३६ वाड्या तहानलेल्या
६५०० ग्रामस्थांची पाण्यासाठी दाहीदिशा
देवरूख (प्रतिनिधी) :
मे महिन्याचा कडक उन्हाळा आणि वाढत्या तापमानामुळे संगमेश्वर तालुक्यात पाणीटंचाईची तीव्रता कमालीची वाढली आहे. तालुक्यातील अनेक गावे आणि वाड्यांमधील पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आटल्यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील १५ गावे आणि ३६ वाड्यांना तीव्र पाणीटंचाईची झळ बसत असून, येथील ग्रामस्थांची तहान भागवण्यासाठी प्रशासनाकडून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
या भीषण टंचाईचा फटका तब्बल ६ हजार ५०० ग्रामस्थांना बसत असून, हे सर्व नागरिक सध्या प्रशासकीय टँकरवरच अवलंबून आहेत. तालुक्यातील विहिरी, कूपनलिका (बोअरवेल) आणि स्थानिक नद्यांनी तळ गाठल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबवण्यासाठी पंचायत समिती आणि टंचाई निवारण विभागाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. सद्यस्थितीत प्रशासनाकडून ३ शासकीय/खाजगी टँकर्सद्वारे प्रभावित गावे आणि वाड्यांमध्ये पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, भौगोलिक विस्तार आणि वाड्यांमधील अंतर यामुळे यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे.
डोंगरभागात वसलेल्या अनेक वाड्यांवर पाण्याचे टँकर पोहोचवताना प्रशासनाला आणि चालकांना कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी रस्ते अरुंद असल्याने पाणी पोहोचवण्यास अडचणी येत आहेत. सकाळपासूनच टँकर कधी येईल, याकडे महिलांचे डोळे लागलेले असतात. टँकर येताच पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांची एकच झुंबड उडत असल्याचे चित्र तालुक्यात पाहायला मिळत आहे. टंचाईची दाहकता पाहता येत्या दिवसांत मागणीनुसार टँकरच्या फेऱ्या वाढवण्यात येतील, तसेच आवश्यकतेनुसार आणखी टँकर मंजूर करण्यात येतील, असे संकेत स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. मात्र, पावसाचे आगमन होईपर्यंत ग्रामस्थांना या पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.













