लातूर येथील RCC कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना NEET पेपरफुटी प्रकरणात CBI ने अटक केली आहे. त्यांच्या शैक्षणिक संकुलातील इमारतींच्या बांधकाम परवान्यांचीही आता चौकशी सुरू करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने संबंधित कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले असून विविध स्तरांवर हालचाली वाढल्या आहेत. RCC क्लासमध्ये शिकणारे काही विद्यार्थी आणि पालक देखील CBI च्या रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे लातूरच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
NEET पेपरफुटी प्रकरणानंतर RCC क्लासेसवर चौकशीचा फास
लातूर : NEET पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आलेले RCC कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. CBI कारवाईनंतर आता त्यांच्या शैक्षणिक संकुलातील बांधकामांचीही तपासणी सुरू करण्यात आली आहे. खोपेगाव शिवारात उभारण्यात आलेल्या इमारतींसाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या का, याची चौकशी प्रशासनाकडून केली जात आहे. जिल्हा प्रशासनाने संबंधितांना नोटीस बजावत सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
लाखो रुपयांची फी घेऊन शिक्षण क्षेत्रात मोठे जाळे उभे करणाऱ्या शिवराज मोटेगावकर यांच्यावर आता विविध स्तरांवरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यांच्या शैक्षणिक संस्थांमधील आर्थिक व्यवहार तसेच इमारतींच्या नियमबाह्य उभारणीबाबतही तपास सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. प्रशासनाच्या या कारवाईमुळे परिसरात मोठी चर्चा रंगली आहे.
विद्यार्थी आणि पालकही CBI च्या रडारवर
NEET पेपरफुटी प्रकरण उघडकीस आल्यानंतर RCC क्लासेस संदर्भात अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. CBI कडून आता या क्लासमध्ये शिक्षण घेतलेल्या काही विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांचीही चौकशी करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. संशयित विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका किंवा उत्तरांची माहिती आधीपासून मिळाली होती का, याबाबत तपास यंत्रणा माहिती गोळा करत आहे.
दरम्यान, या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुण्यातील एका प्राध्यापिकेलाही या तपासादरम्यान अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. संपूर्ण प्रकरणामुळे राज्यभरातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.










