डिचोली पोलिसांची कारवाई
डिचोली : प्रतिनिधी
कुडणे-साखळी येथे झालेल्या शैला संजय घाडी (५८) या महिलेच्या खून प्रकरणातील फरार संशयित सागर रमेश राऊळ (वय ३४, रा. मळईवाडी, शिरशिंगे, ता. सावंतवाडी) याला ठाणे येथून ताब्यात घेण्यात डिचोली पोलिसांना यश आले आहे. खुनाच्या घटनेनंतर अवघ्या २४ तासांच्या आत पोलिसांनी ही कामगिरी केली. संशयिताला ट्रान्झिट रिमांडवर गोव्यात आणले आहे.
चिकणे-कुडणे येथील शैला संजय घाडी या महिलेचा खून झाल्याची माहिती डिचोली पोलिसांना मिळाली होती. संशयित सागर राऊळ याने केलेल्या बेदम मारहाणीत या महिलेचा मृत्यू झाला होता. खून केल्यानंतर संशयिताने घरातून सोन्याची साखळी आणि मृत महिलेचा मोबाईल घेऊन पोबारा केला होता. तसेच त्याने मृत महिलेच्या मोठ्या मुलीला फोन करून तिच्या आईचा खून केल्याची माहिती दिली आणि तिला व तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीही दिली होती.
या प्रकरणी शुभम संजय घाडी यांच्या तक्रारीवरून डिचोली पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता.फरार संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक विजय राणे सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथके स्थापन करण्यात आली होती. पोलीस उपनिरीक्षक विराज धाऊसकर आणि आकाश परवार यांच्या पथकांनी सावंतवाडी, कोल्हापूर आणि मुंबई परिसरात कसून शोधमोहीम राबवली.
तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन आणि महाराष्ट्रातील मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या क्राईम ब्रांच युनिट ४ च्या मदतीने संशयिताचा माग काढण्यात आला. तो ठाणे परिसरात असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली. डिचोली पोलीस, महाराष्ट्र क्राईम ब्रांच आणि स्थानिक खबऱ्यांच्या मदतीने संयुक्त कारवाई करत सागर रमेश राऊळ याला ठाणे जिल्ह्यातील चेना ब्रिजजवळील ‘द्वारका हॉटेल’ परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेतल्यानंतर सायंकाळी काशीगाव पोलीस ठाण्यात त्याला अधिकृतपणे अटक करण्यात आली. त्याला मीरा-भाईंदर, ठाणे येथील न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांड मंजूर करण्यात आला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संशयिताला गोव्यात आणण्यात आले.












