दागिने आणि रोख रकमेसह चोरांचा पोबारा
पेडणे (प्रतिनिधी) :
पेडणे – नानेरवाडा येथील रेणुका रामा शिरोडकर यांच्या घरात सोमवारी चोरट्याने दरवाजाचे कुलूप कटरने तोडून सुमारे तीन लाख रुपयाचे मंगळसूत्र तसेच रोख रक्कम ७० हजार रुपये घेऊन पोबारा केला. ही घटना सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. भर दिवसा झालेल्या या धाडसी चोरीमुळे पेडणे बाजारपेठेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रेणुका शिरोडकर या बाजारपेठेतील दुकानात गेल्या होत्या. त्या परत घराकडे आल्या असता घराचे दरवाजाचे कुलूप कापून टाकलेले निदर्शनास आले. आतील कपाटही उघडे होते. कपडे अस्तव्यस्त विखुरलेले होते. यावरून घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.
पेडणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चोरी झालेल्या खोलीची पाहणी केली. पेडणे पोलीस निरीक्षक सचिन लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचा पंचनामा करण्यात आला.

रेणुका शिरोडकर या तळमजल्यावर राहत होत्या. वरच्या मजल्यावर भाडेकरू राहत होते . रेणुका यांचे पती रामा शिरोडकर हे वनखात्यात नोकरीला असून ते कामावर गेले होते. चोरट्यानी भाडेकरूच्या दरवाजाला बाहेरून कडी लावली आणि कटर द्वारे मुख्य दरवाजाचे कुलूप आणि कडी तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटे तपासली असता चोरटे रोख रक्कम तसेच मंगळसूत्र घेऊन पळाल्याचे स्पष्ट झाले. पेडणे पोलीस चोरी प्रकरणाचा कसून तपास करत असल्याची माहिती निरीक्षक सचिन लोकरे यांनी दिली.
——-












