मसुरे | झुंजार पेडणेकर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेत परांजपे मोतिवाले हायस्कूल चिपळूणची विद्यार्थिनी कु. स्वराली संस्कृती सतिश मुणगेकर हिने ९५.४० टक्के गुण मिळवत प्रशालेत प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. त्याबद्दल श्रीराम एज्युकेशन सोसायटी चिपळूणचे विश्वस्त डॉ. श्री.यतिन जाधव व पदाधिकारी यांचे हस्ते स्वरालीचा सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थी सोहळ्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रशांत देवळेकर,उपाध्यक्ष सौ.सई वरवाटकर, सचिव श्री मल्लेश लके, कोषाध्यक्ष श्री. सिद्धेश लाड ,सदस्य श्री. कांता चिपळूणकर सर्व गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते. देवगड तालुक्यातील मुणगे हे स्वरालीचे मूळ गाव आहे.
लहानपणापासून अभ्यासात सातत्य ठेवणाऱ्या स्वरालीने अनेक स्पर्धा परीक्षा देऊन यश संपादन केले .पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवत आपल्या बुद्धीमत्तेची झलक दाखवली होती. अभ्यासाबरोबरच वक्तृत्व, कथाकथन,नाट्य अभिनय,ड्राइंग,कार्यानुभव,या क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. चित्रकलेच्या एलिमेंटरी तसेच इंटरमिजिएट परीक्षेत A ग्रेड प्राप्त केला आहे. मंचावर आत्मविश्वासाने बोलण्याची तिची शैली ,भारदस्त आवाज आणि विषय मांडण्याची क्षमता यामुळे ती लहान वयातच सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. स्वरालीचे स्वतःचे युट्युब चॅनेलसुद्धा आहे.
दहावीच्या परीक्षेसाठी स्वरालीने सुरुवातीपासूनच नियोजनबद्ध अभ्यासावर भर दिला होता. प्रत्येक विषयाचा नियमित सराव, वेळेचे योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण मेहनतीमुळे तिला हे घवघवीत यश मिळाले. आपल्या या उज्वल यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले असे स्वराली म्हणाली.
निकाल जाहीर होताच स्वरालीवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला असून, मित्रपरिवार, शिक्षक आणि परिसरातील नागरिकांकडून तिचे कौतुक करण्यात येत आहे.













