केरोसीन व धान्य वितरणातील अडचणी दूर करण्याची मागणी

रत्नागिरी : केरोसीन वितरण, धान्य वितरण तसेच धान्य वितरण कमिशन न मिळाल्याच्या समस्यांबाबत रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसीन चालक/मालक संघटना, रत्नागिरी यांनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. संघटनेने जिल्हा अधिकाऱ्यांसह संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधून विविध अडचणी तत्काळ सोडविण्याची मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या निर्णयानुसार केरोसीन वितरणासंबंधी आदेश काढण्यात आले असले तरी धान्य आणि सेवा वितरणात काही अडचणी निर्माण होत आहेत. त्यानुसार केरोसीन दुकानदारांकडे पुरेसा साठा उपलब्ध राहणे आवश्यक असून सर्व कार्डधारकांना केरोसीन मिळाल्यानंतरच पुढील प्रक्रिया होणे अपेक्षित असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.

तसेच शासनाच्या आदेशानुसार मे व जून महिन्यांचे ई-पॉसद्वारे धान्य वितरण पूर्ण झाल्यानंतरच पुढील महिन्याचे धान्य वाटप करण्याची अट असल्याने दुकानदारांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात सांगण्यात आले आहे. अनेक ठिकाणी धान्य शिल्लक असूनही वितरण प्रक्रिया थांबण्याची शक्यता असल्याने कार्डधारकांना वेळेत धान्य मिळण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती संघटनेने व्यक्त केली आहे.

याशिवाय धान्य वितरणाचे कमिशन अद्याप मिळाले नसल्याने दुकानदार आर्थिक अडचणीत सापडल्याचे संघटनेने नमूद केले असून प्रशासनाने या सर्व बाबींचा तातडीने विचार करून वितरणातील त्रुटी दूर कराव्यात आणि केरोसीन व धान्य वितरण सुरळीत करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.