मळगांव येथे ३१ मे रोजी भव्य सकल हिंदू संमेलन

​सावंतवाडी । प्रतिनिधी : सनातन हिंदू धर्म, परंपरा आणि संस्कृतीचे संवर्धन तसेच संरक्षण करण्याच्या उदात्त हेतूने सावंतवाडी तालुक्यातील मळगाव पंचक्रोशी येथे भव्य ‘सकल हिंदू संमेलना’चे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन रविवार, दिनांक ३१ मे २०२६ रोजी सायंकाळी ठीक ४:०० वाजता मळगाव येथील शालू मंगल कार्यालय येथे संपन्न होणार आहे. बदलत्या काळात देश, धर्म आणि संस्कृतीसमोर उभ्या ठाकलेल्या विविध आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि हिंदू बांधवांमध्ये व्यापक जागृती निर्माण करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. या संमेलनाच्या माध्यमातून सर्व भेदभाव विसरून संपूर्ण हिंदू समाजाने एकत्र यावे आणि संघटित शक्तीचे प्रदर्शन करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

​या भव्य संमेलनाला मार्गदर्शक आणि प्रमुख वक्ते म्हणून सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रविणकुमार गणेशराव ठाकरे उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. उच्चशिक्षित असलेले डॉ. ठाकरे हे एम.डी., एल.एल.बी., एम.बी.ए. आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मेडिकोलीगल स्टडीज अशा विविध पदव्यांनी विभूषित असून, ते आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून सद्यस्थितीवर प्रकाश टाकणार आहेत. याशिवाय कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय सावंतवाडी तालुक्याचे अध्यक्ष ह.भ.प. श्री लक्ष्मण दत्ताराम कडव महाराज यांची वंदनीय उपस्थिती लाभणार आहे. या संपूर्ण सोहळ्याचे संयोजन निवृत्त राजपत्रित अधिकारी ह.भ.प. श्री शेखर मधुकर पाडगावकर यांनी केले असून, हिंदू संमेलन समन्वय समिती मळगाव पंचक्रोशी हे या कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत.
​आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचशे वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर आणि अथांग त्यागातून साकारलेले भव्य श्रीराम मंदिर हे केवळ एक वास्तू नसून ते सनातन हिंदू संस्कृतीच्या अदम्य आत्मविश्वासाचे आणि श्रद्धेचे दिव्य प्रतीक आहे. मात्र, सद्यस्थितीत देशाच्या विविध भागांत हिंदू समाजासमोर अनेक गंभीर संकटे निर्माण झाली आहेत. काश्मीरमधील हिंदूंचे पलायन, बंगालमधील हिंदूंची दुरावस्था, केरळमधील महिलांवर होणारे अत्याचार आणि कर्नाटकसारख्या राज्यात हिंदू सण-उत्सव साजरे करण्यावर किंवा धार्मिक प्रतीकांचा वापर करण्यावर येणारे निर्बंध पाहता, आता महाराष्ट्रातही अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी वेळीच संघटित होणे अत्यंत आवश्यक बनले आहे. आपल्या भगिनींच्या सुरक्षिततेसाठी आणि धर्मसंस्कृतीच्या रक्षणासाठी सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे.
​हा मेळावा प्रत्येक हिंदू कुटुंबासाठी आणि घरातील प्रत्येक सदस्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ‘हिंदू सारा एक’ हा मंत्र दाही दिशांना घुमवण्यासाठी आणि हिंदू एकतेची सामूहिक शक्ती प्रकट करण्यासाठी मळगाव पंचक्रोशीतील तसेच परिसरातील सर्व माता, बंधू आणि भगिनींनी आपल्या मित्रपरिवारासह आणि कुटुंबासह पारंपरिक मंगल वेषात या संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आग्रहाचे आणि नम्र आवाहन हिंदू संमेलन समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.