गुन्हे तपासात रत्नागिरी पोलिसांचा वेग; मुदत पूर्ण झालेल्या सर्व प्रकरणांत दोषारोपपत्रे दाखल

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने गुन्ह्यांच्या तपासामध्ये वेळेत दोषारोपपत्रे न्यायालयात सादर करत उल्लेखनीय कामगिरी केली असून, कायदेशीर मुदत पूर्ण झालेल्या सर्व प्रकरणांमध्ये १०० टक्के दोषारोपपत्रे दाखल करण्याचे यश मिळवले आहे. पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या आढाव्यात ही बाब समोर आली.

१ जानेवारी २०२६ ते १८ मे २०२६ या कालावधीतील गुन्हे तपासाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यामध्ये १० वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद असलेले गुन्हे, ज्यामध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी ६० दिवसांची मुदत असते, तसेच १० वर्षांपेक्षा अधिक शिक्षेची तरतूद असलेले गुन्हे, ज्यासाठी ९० दिवसांची मुदत निश्चित आहे, अशा दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश होता.

या आढाव्यानुसार, १० वर्षांपेक्षा कमी शिक्षेच्या तरतुदीतील एकूण ७८० गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यापैकी ३२७ गुन्ह्यांमध्ये विहित मुदतीत दोषारोपपत्रे न्यायालयात सादर करण्यात आली आहेत. उर्वरित ३२४ गुन्हे तपासाधीन असून, त्या प्रकरणांमध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यासाठीची ६० दिवसांची मुदत अद्याप पूर्ण झालेली नाही.

तसेच, १० वर्षांपेक्षा अधिक शिक्षेच्या तरतुदीतील ४८ गुन्ह्यांची नोंद झाली होती. यापैकी २५ गुन्ह्यांमध्ये वेळेत दोषारोपपत्रे दाखल करण्यात आली असून, उर्वरित २४ प्रकरणांमध्ये तपास सुरू आहे. या गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्र सादर करण्यासाठीची ९० दिवसांची मुदत अद्याप संपलेली नसल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.

ज्या सर्व गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्र दाखल करण्याची कायदेशीर मुदत पूर्ण झाली आहे, त्या सर्व प्रकरणांमध्ये रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने १०० टक्के प्रमाणात दोषारोपपत्रे न्यायालयात सादर केली आहेत. वेळेत, काटेकोरपणे आणि समन्वयाने तपास पूर्ण करून ही कामगिरी साध्य झाली असून, भविष्यातही गुन्हे तपासाची गुणवत्ता आणि कार्यक्षमता अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हा पोलीस दल कटिबद्ध असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे