​सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला ‘लोकमान्य मधु दंडवते’ नाव

सावंतवाडी शहरात पेढे वाटून आणि फटाके फोडून जल्लोष

​सावंतवाडी । प्रतिनिधी :
कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि ज्येष्ठ नेते प्रा. मधु दंडवते यांचे नाव सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला देण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या टर्मिनसचे नाव आता “लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस” असे होणार असून, राज्य सरकारकडून हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. कोकणातील जनतेची आणि रेल्वे प्रवासी संघटनेची ही अनेक वर्षांची मागणी अखेर मार्गी लागल्याने सावंतवाडीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

​या ऐतिहासिक निर्णयाचे वृत्त समजताच सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने शहरात व रेल्वे स्थानकावर पेढे वाटून, तर ऐतिहासिक गांधी चौक येथे फटाक्यांची आतिषबाजी करून जोरदार स्वागत करण्यात आले.

​१० वर्षांपासून रखडले होते टर्मिनसचे काम:
​सावंतवाडी रेल्वे स्थानकावर टर्मिनसचे भूमिपूजन २७ जून २०१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते. यावेळी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, माजी खासदार विनायक राऊत, तत्कालीन पालकमंत्री व विद्यमान आमदार दीपक केसरकर उपस्थित होते. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी टर्मिनसच्या दोन टप्प्यांतील विकासासाठी १८ कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र, पहिल्या टप्प्याचे काम झाल्यानंतर गेल्या दहा वर्षांत दुसऱ्या टप्प्याचे काम रखडले होते.

​रेल्वे टर्मिनसवर पेढे वाटप:
​कॅबिनेटच्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव मिहीर मठकर, प्रशांत जयानंद मठकर, अभिमन्यू लोंढे, रेल्वे स्थानक रिक्षा संघटना पदाधिकारी व अन्य पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी रेल्वे टर्मिनसवर जाऊन प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना पेढे वाटले. प्रा मधु दंडवते यांच्या नावाने घोषणाही दिल्या.

​लढ्याला मोठे यश: मिहीर मठकर
“रेल्वे प्रवासी संघटनेच्या आंदोलनाला आणि सातत्यपूर्ण मागण्यांना आज मोठे यश आले आहे. मठकर कुटुंबाने पुढाकार घेऊन सुरुवातीला सावंतवाडी स्थानकावर प्रा. मधु दंडवते यांचे तैलचित्र लावले होते, त्यानंतर कोकणातील ११ रेल्वे स्थानकांवर तैलचित्रे लावण्यासाठी निवेदने दिली होती. प्रवासी संघटनेच्या चळवळीमुळेच सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या विकासाला गती मिळत आहे. या निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,पालकमंत्री नितेश राणे यांना धन्यवाद देऊन आभार व्यक्त करतो. खासदार नारायण राणे, आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांचे आम्ही आभार मानतो. रेल्वे टर्मिनस विकासाची नांदी सुरू झाली असे मानतो” .