कणकवली | मल्हार नदीत बुडून प्रकाश गावकर यांचा मृत्यू

नातेवाइकांनी रात्रीच्या अंधारात घेतला शोध

नाटळ येथील ५२ वर्षीय रहिवासी कुंभवडेतील तावडेची कोंड परिसरात आढळले

मासेमारीसाठी गेल्याचा नातेवाइकांचा अंदाज

कणकवली : नाटळ येथील दुबळेश्वरवाडीमधील रहिवासी प्रकाश राघो गावकर (वय ५२) यांचा मल्हार नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. कुंभवडे येथील तावडेची कोंड परिसरात मल्हार नदीच्या पात्रात शनिवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास ते अर्धवट बुडालेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेमुळे नाटळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश गावकर हे शुक्रवार, १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून घरातून बाहेर पडले होते. मात्र, सायंकाळी ७ वाजेपर्यंत ते घरी परतले नसल्याने त्यांच्या नातेवाइकांना चिंता वाटू लागली. त्यानंतर त्यांचे पुतणे विशाल राजाराम गावकर आणि इतर नातेवाइकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली.

शोध सुरू असताना नाटळ-नरडवे मार्गालगत दुबळेश्वरवाडी येथे प्रकाश गावकर यांची दुचाकी उभी करून ठेवलेली आढळून आली. दुचाकी आढळल्याने नातेवाइकांनी परिसरात अधिक शोध घेतला. प्रकाश गावकर हे मासेमारीसाठी मल्हार नदीच्या पात्रात गेले असावेत, असा अंदाज त्यांना आला.

त्यानंतर नातेवाइकांनी कुंभवडे ते सांगवे या परिसरातील मल्हार नदीच्या पात्रात शोधमोहीम सुरू केली. रात्रीची वेळ असल्याने बॅटरीच्या प्रकाशात नदीपात्र आणि परिसरात त्यांचा शोध घेण्यात आला. नातेवाइकांकडून रात्रीच्या अंधारात सुरू असलेल्या या शोधमोहीमेदरम्यान कुंभवडे येथील तावडेची कोंड परिसरात नदीच्या पाण्यात प्रकाश गावकर अर्धवट बुडालेल्या अवस्थेत आढळून आले.

नातेवाइकांनी त्यांच्याजवळ जाऊन पाहिले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मृतदेह नदीच्या पाण्याबाहेर काढण्यात आला.

प्रकाश गावकर यांच्या मृत्यूमागील नेमकी परिस्थिती काय होती, याबाबत अधिक तपास सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार सुनील वेंगुर्लेकर करीत आहेत.