जनगणनेच्या नावाखाली सायबर फसवणुकीचा धोका; राजापूर नगर परिषद प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

राजापूर प्रतिनिधी: देशभरात एप्रिल २०२६ पासून सुरू झालेल्या जनगणना प्रक्रियेअंतर्गत राजापूर शहरात १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत घरगुती माहिती संकलनाचे काम सुरू आहे. मात्र, या प्रक्रियेच्या नावाखाली सायबर फसवणूक होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. तरी याबाबत नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेऊन सावधानता बाळगावी असे आवाहन राजापूर नगर परिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
राजापूर शहरात या कामासाठी २२ प्रगणक व ४ पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले असून, सरकारी शाळा व हायस्कूलमधील शिक्षकांचाही सहभाग आहे. राजापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजित कुंभार हे चार्ज ऑफिसर म्हणून काम पाहत असून, कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र जाधव हे सहाय्यक चार्ज ऑफिसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, अधिकृत प्रगणकांकडे केंद्र सरकार किंवा जिल्हा प्रशासनाचे ओळखपत्र असणार असून त्यावर Registrar General & Census Commissioner India यांचा लोगो, अधिकृत शिक्का किंवा होलोग्राम असेल. तसेच क्यूआर कोड स्कॅन करून संबंधित प्रगणकाची माहिती पडताळता येणार आहे.
जनगणना प्रक्रियेदरम्यान कुटुंबातील सदस्य संख्या, शिक्षण, व्यवसाय, पाणी, वीज, शौचालय आदी सुविधांबाबत ३३ प्रश्न विचारले जाणार आहेत. मात्र कोणताही अधिकृत प्रगणक बँक खाते, एटीएम पिन, सीव्हीव्ही, आधार किंवा पॅन लिंकसंदर्भातील माहिती मागणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कोणत्याही व्यक्तीबाबत संशय आल्यास नागरिकांनी तत्काळ तहसील कार्यालय किंवा नगरपरिषदेशी संपर्क साधावा, तसेच खात्रीशिवाय अनोळखी व्यक्तींना घरात प्रवेश देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. सायबर फसवणूक झाल्यास त्वरित १९३० या सायबर क्राइम हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचेही आवाहन प्रशासनाने एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.