विरोधक फेसलेस; “झुरळच चेहरा” पुढे आणण्याची वेळ आली – आमदार प्रमोद जठार

खेड | प्रतिनिधी : भाजपविरोधात सक्षम नेतृत्व उरलेले नसून विरोधी पक्ष पूर्णपणे “फेसलेस” झाले आहेत, असा घणाघाती आरोप विधानपरिषद आमदार प्रमोद जठार यांनी खेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. विरोधी पक्षांच्या आघाडीत एकमेकांवरील विश्वास संपुष्टात आला असून त्यांच्याकडे जनतेसमोर मांडण्यासाठी प्रभावी नेतृत्व नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
पत्रकार परिषदेत बोलताना आमदार जठार यांनी ठाकरे, पवार आणि गांधी या प्रमुख विरोधी नेत्यांवर निशाणा साधला. हे नेते आता जनतेवर प्रभाव टाकण्यात अपयशी ठरत असल्याचा दावा करत त्यांनी विरोधकांची राजकीय ताकद कमी झाल्याचे म्हटले. विरोधी पक्षांकडे ठोस नेतृत्व नसल्याने नाइलाजास्तव त्यांनी “झुरळाचा फेस” पुढे आणल्याची खोचक टिप्पणीही जठार यांनी केली.
राजकारणात प्रत्येक पक्षाची ओळख त्याच्या नेतृत्वामुळे निर्माण होत असते. मात्र आजच्या घडीला विरोधी पक्षांकडे जनतेला विश्वास वाटेल असे नेतृत्व दिसून येत नसल्याचे जठार यांनी सांगितले. विरोधकांमध्ये समन्वयाचा अभाव असून आघाडीतील घटक पक्ष एकमेकांवरच विश्वास ठेवत नसल्याने त्यांची राजकीय विश्वासार्हता कमी झाल्याचा आरोप त्यांनी केला.
देशात आणि राज्यात भाजपने केलेल्या विकासकामांच्या बळावर जनतेचा विश्वास कायम राखला आहे. याउलट विरोधी पक्षांकडे कोणताही ठोस कार्यक्रम किंवा सक्षम पर्याय नसल्यामुळे ते केवळ टीका करण्यापुरते मर्यादित राहिले असल्याचे जठार यांनी म्हटले.
पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी विरोधी पक्षांवर जोरदार शाब्दिक हल्लाबोल करत भाजपविरोधात कोणताही सक्षम, प्रभावी आणि विश्वासार्ह पर्याय सध्या उपलब्ध नसल्याचा दावा केला. आगामी काळातही जनतेचा कौल भाजपलाच मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.