विशाल अग्रवाल यांच्या पार्टीतील व्हिडिओवर सोशल मीडियात जोरदार चर्चा
मृत तरुणीच्या वडिलांनी व्यक्त केला तीव्र संताप, कठोर कायद्यांची मागणी
मे 2024 मध्ये पुण्यात घडलेल्या पोर्शे अपघात प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. या प्रकरणातील आरोपी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांचा एक डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये विशाल अग्रवाल आणि त्यांची पत्नी एका पार्टीमध्ये आनंद साजरा करताना दिसत आहेत. या व्हिडिओनंतर मृत तरुणीच्या वडिलांनी संताप व्यक्त करत कठोर शिक्षेची मागणी केली आहे. दरम्यान, विशाल अग्रवाल यांनी हा व्हिडिओ जुनाच असल्याचे स्पष्ट करत आरोप फेटाळले आहेत.
पुणे : गेल्या वर्षी मे 2024 मध्ये घडलेल्या पोर्शे अपघात प्रकरणाने देशभरात मोठी खळबळ उडवली होती. एका नामांकित बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत भरधाव पोर्शे कार चालवत दोन तरुणांना धडक दिली होती. या भीषण अपघातात एका तरुणासह एका तरुणीचाही जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर आरोपी अल्पवयीन मुलासह त्याच्या कुटुंबीयांवरही विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, आता या प्रकरणाशी संबंधित विशाल अग्रवाल यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विशाल अग्रवाल आणि त्यांची पत्नी एका भव्य पार्टीमध्ये आनंद साजरा करताना दिसत आहेत. गळ्यात नोटांच्या माळा घालून दोघेही संगीताच्या तालावर नाचताना दिसत असल्याने सोशल मीडियावर अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. विशेष म्हणजे, विशाल अग्रवाल सध्या जामिनावर बाहेर आहेत.
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीच्या वडिलांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले की, आता व्यवस्थेवरचा विश्वास उरलेला नाही. कितीही मोठी शिक्षा झाली तरी आरोपींची सुटका होते, त्यामुळे सामान्य लोकांमध्ये चुकीचा संदेश जात आहे. तसेच देशात कठोर कायदे लागू करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर विशाल अग्रवाल यांनीही स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, हा व्हिडिओ त्यांच्या जामिनानंतरच्या जल्लोषाचा नसून जुना आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा व्हिडिओ 2 सप्टेंबर 2023 रोजी गोव्यात शूट करण्यात आला होता. त्या वेळी ते आणि त्यांची पत्नी शिवानी अग्रवाल लग्नाच्या 25 व्या वाढदिवसानिमित्त आनंद साजरा करत होते.
या संपूर्ण प्रकरणामुळे पोर्शे अपघात प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून सोशल मीडियावर याबाबत विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.










