NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने फिजिक्स विषयाच्या प्राध्यापिका मनीषा हवालदार यांना अटक केली आहे. एनटीएतील सूत्रांच्या मदतीने फिजिक्सच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न बाहेर काढल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. उमेदवारांकडून पैशांच्या बदल्यात प्रश्न पुरवल्याचा गंभीर दावा सीबीआयने न्यायालयात केला. या प्रकरणात आतापर्यंत ११ जणांना अटक करण्यात आली असून तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे. मनीषा हवालदार यांना ट्रान्झिट रिमांडवर दिल्लीला नेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
फिजिक्स पेपर लीक प्रकरणात मनीषा हवालदार अटकेत
लातूर : NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई करत फिजिक्स विषयाच्या प्राध्यापिका मनीषा संजय हवालदार यांना अटक केली आहे. त्या सेठ हिरालाल विद्यालयाशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मधील सूत्रांच्या मदतीने त्यांनी भौतिकशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न मिळवल्याचा आरोप तपास यंत्रणेकडून करण्यात आला आहे.
सीबीआयच्या माहितीनुसार, मनीषा हवालदार यांनी उमेदवारांना प्रश्न पुरवण्यासाठी पैशांची मागणी केली होती. काही प्रश्न नोट्समध्ये लिहून ते व्हॉट्सअॅपद्वारे पुढे पाठवण्यात आल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे. या बदल्यात रोख रक्कम स्वीकारल्याची माहितीही समोर आली आहे.
सीबीआयचा न्यायालयात मोठा दावा
काल रात्री मनीषा हवालदार यांना न्यायालयात हजर करण्यात आले. ट्रान्झिट रिमांडसाठी सादर करताना सीबीआयने न्यायालयात महत्त्वाचे दावे केले. तपास यंत्रणेकडे स्पष्ट पुरावे असून प्रश्नपत्रिका पुरवल्याची कबुली संबंधितांकडून मिळाल्याचा दावा करण्यात आला. इतर आरोपींनी आरोप नाकारले असले तरी मनीषा हवालदार यांनी काही बाबींमध्ये सहकार्य केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची ट्रान्झिट रिमांड मंजूर केली असून २५ मे रोजी दिल्लीतील विशेष सीबीआय न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणात NTA मधील काही अधिकाऱ्यांचाही सहभाग असण्याची शक्यता तपासली जात आहे. आतापर्यंत या प्रकरणात एकूण ११ जणांना अटक करण्यात आली असून तपास सुरू आहे.











