वाढदिवसानिमित्त विक्रांत सावंत य यांचा भाजप कार्यालयात सत्कार
सावंतवाडी । प्रतिनिधी : माझ्याकडे लोकांची शिदोरी आहे. या शिदोरीच्या, नेत्यांच्या पाठिंब्याच्या आणि कुटुंबाच्या पुण्याईच्या जोरावरच मी जिल्हा परिषद निवडणुकीत जिल्ह्यातून दुसऱ्या आणि तालुक्यातून पहिल्या क्रमांकाचे मताधिक्य घेत यशस्वी होऊ शकलो. पक्षाने व सहकाऱ्यांनी आपलं प्रेम असंच कायम ठेवावं, असं मत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांनी व्यक्त केले.
सावंतवाडी येथील भारतीय जनता पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात विक्रांत सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, स्व. विकास भाईंच्या निधनाने आमची मोठी हानी झाली आहे. मात्र, समाजासाठी कार्य करताना या दुःखाची जाणीव होत नाही. म्हणूनच आजचा वाढदिवस कोणतीही झगमगाट न करता समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम माझ्या कुटुंबाने नेहमीच केले असून तोच वारसा मला पुढे घेऊन जायचा आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीत माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे यांची मला मोलाची साथ लाभली. माजी मंत्री स्व. भाईसाहेब सावंत, स्व. विकास भाईंची पुण्याई आणि सोबत असणाऱ्या लोकांची शिदोरी यावरच मी हा विजय मिळवू शकलो. महायुतीच्या स्थानिक नेत्यांनी ताकद दिल्यानेच हे मोठे मताधिक्य शक्य झाले,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
दरम्यान, भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांनी आपले मनोगत व्यक्त करत विक्रांत सावंत यांना शुभेच्छा दिल्या. “विक्रांत सावंत यांचे भविष्य उज्ज्वल आहे. कुटुंबाचा मोठा वारसा त्यांना लाभला असून त्यांनी भाजपात यावे अशी आमची इच्छा होती. त्यांच्या प्रवेशामुळे सावंतवाडी तालुक्यातील भाजपची ताकद आणखी वाढली आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी भाजप पक्षाच्या वतीने त्यांना वृक्ष (रोपटे) देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, शहराध्यक्ष सुधीर आडीवरेकर यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला जिल्हा बँक संचालक महेश सारंग, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, शहर मंडळ अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, बांदा मंडळ अध्यक्ष मधुकर देसाई, पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर, सभापती प्रतिक बांदेकर, सरपंच विजय गावडे, उपसरपंच भरत गांवकर, तसेच संजय कानसे, अशोक माळकर, प्रवीण देसाई, प्रा. केदार म्हसकर, प्रसाद गावडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.













