नैसर्गिक नाल्यावर आरसीसी भिंत; शंकरवाडीतील प्रकार

पुराचे पाणी शहरात शिरण्याची भीती; नगरसेवक संदीप भिसे आक्रमक
चिपळूण (प्रतिनिधी) : शहरातील शंकरवाडी येथील नैसर्गिक नाल्यावर मोठ्या प्रमाणात बांधकाम करण्यात आले आहे. नाल्यावरच आरसीसी भिंत उभारल्याने पावसाळ्यात शंकरवाडी परिसरात पुराचे पाणी भरण्याची शक्यता आहे. यावरून स्थानिक नगरसेवक संदीप भिसे व नागरिकांनी पालिकेवर धडक देत नाल्यावरील बांधकाम तोडण्याची मागणी केली. यावर नगररचना अधिकाऱ्यांनी संबंधीत बांधकाम व्यावसायिकास नोटीस देत बांधकाम काढण्याचे आश्वासन दिले.
शहरात पूरपरिस्थिती निर्माण होत असल्याने दोन वर्षापूर्वी शंकरवाडी येथे नलावडा बंधारा नव्याने उभारण्यात आला. आमदार शेखर निकम यांनी पाठपुरावा केल्यानंतर बंधाऱ्यासाठी निधी मिळाला होता. या नलावडा बंधाऱ्यांच्या अलिकडील बाजूस नैसर्गिक नाल्यावर मोठ्या प्रमाणात बांधकाम करून मजबूत उंच आरसीसी भिंत घालण्यात आली आहे. मुळात शहरात लाल व निळ्या पूररेषेमुळे बांधकामास त्वरित मान्यता मिळत नाही. त्यातच प्रतिबंधित क्षेत्रात बांधकाम केले जात आहे. मार्कंडी काविळतळी शंकरवाडी भागातील पुराचे पाणी याच नलावडे नाल्यातून जात असते. मात्र आता या नाल्यावर आरसीसी भिंत घालण्यात आल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण झाले आहेत. यावरून आक्रमक झालेले भाजपचे स्थानिक नगरसेवक संदीप भिसे यांनी नगर पालिकेत धाव घेऊन बांधकाम प्रश्नी जाब विचारला. पालिकेचे उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे व सहायक नगररचना अधिकारी नम्रता खेरमुडकर यांना शंकरवाडीतील बेकायदा बांधकामाची माहिती दिली. नाल्यावरील भिंत न काढल्यास शंकरवाडी तसेच गोसावीवाडी येथे पुराचे पाणी साचून राहणार आहे. या नाल्यातून पाणी वाहून गेल्यानंतर शहरातील पुराच्या पाण्याची पातळी देखील कमी होते. या भागात दोन वाड्यांना जोडणाऱ्या मार्गावरही बांधकाम करण्यात आले आहे. या परिसरातील शेती देखील धोक्यात आली आहे. वाशिष्ठी नदीपासून काही अंतरावरच प्रतिबंधित क्षेत्रात हे बांधकाम सुरू असून ते तातडीने काढून टाकण्याची मागणी नगरसेवक भिसे यांनी केली. त्यानुसार संबंधित बांधकाम व्यावसायिकास नोटीस देण्यात येणार असून तातडीने बांधकाम काढण्याची कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिले.