चिपळूण : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इ .४थी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित प्रेमजीभाई आसर प्राथमिक विद्यालयाने आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा यंदाही कायम राखली आहे. शाळेतील तब्बल १४ विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावले, हे या यशाचे विशेष वैशिष्ट्य ठरले आहे.
या परीक्षेत अन्वी दिनेश जाक्कर ही चिपळूण तालुक्यात पहिल्या तर रत्नागिरी जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकाने गुणवत्ता यादीत आली तसेच सई किशोर आंब्रे (७वी), वेदश्री नितीन शिगवण (२४वी), देवांश अभिजीत देशमाने (२९वा), अनिश समीर भायजे (३५वा), रेवांत समीर जाधव (३९वा), सान्वी सुनील गोरे (४२वी), अद्वैत रत्नकांत पांचाळ (४५वा), क्षिप्रा पराग ओक (७३वी), मनस्वी महेंद्र सुतार (७७वी), मैथिली मंदार चांदिवडे (१०६वी), आराध्या वैभव मोरे (१०७वी), आदित्य खंडू माटोरे (१०९वा) आणि श्रीशा श्रीकांत पाटील (११७वी) या विद्यार्थ्यांनी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय व घवघवीत यशाबद्दल संस्थेचे संचालक, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि पालकांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक व अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांची जिद्द, सातत्यपूर्ण सराव, कठोर परिश्रम तसेच शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळे हे उत्तुंग यश संपादन करता आले, असे शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. संगिता नाईक यांनी सांगितले.
या अभिमानास्पद यशाबद्दल गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक आणि मार्गदर्शक शिक्षक यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. चौदा विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा उज्ज्वल परंपरा अधोरेखित केली आहे.












