पत्रकारांसोबतच्या चर्चेत विकास आराखड्याचे सादरीकरण
जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र बनवणार
सावंतवाडी । प्रतिनिधी : सुमारे १५० वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेले आणि सावंतवाडीचे ‘हृदय’ मानल्या जाणाऱ्या मोती तलावाचा मूळ ऐतिहासिक लुक कायम ठेवून संपूर्ण परिसराचा कायापालट केला जाईल, अशी माहिती नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धा सावंत भोंसले व युवराज लखमराजे भोंसले यांनी दिली. या ऐतिहासिक तलावाच्या दूरदृष्टी विकास आराखड्याचे (व्हिजन प्लॅन) सादरीकरण नुकतेच मंत्री नितेश राणे यांच्यासमोर करण्यात आले. त्यानंतर सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली.
पाणी स्वच्छतेसाठी ‘फिल्टर प्लांट’ आणि सुरक्षित भिंती
पत्रकारांशी बोलताना नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोंसले म्हणाल्या की, महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे आणि माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे सादरीकरण झाले आहे. तलावाचे सौंदर्य वाढवतानाच त्याच्या संवर्धनाला प्राधान्य दिले जाईल. तलाव परिसरातील भिंतींचे संरक्षण करण्यासोबतच, पाणी गढूळ होऊ नये म्हणून ‘वॉटर फिल्टर प्लांट’ बसवला जाणार आहे. यामुळे केवळ स्वच्छ पाणीच तलावात जाईल आणि बाहेरून येणारी माती आत रोखली जाईल.
*फूड प्लाझा, बोटिंग आणि हॅण्ड क्राफ्ट मार्केट*
तलावाच्या खाऊ गल्लीसाठी आरक्षित असलेल्या भागात वाढ करून त्या ठिकाणी सुसज्ज ‘फूड प्लाझा’ आणि ‘बोटिंग प्रोजेक्ट’ सुरू केला जाईल. तसेच, दरवर्षी भरणाऱ्या विविध महोत्सवांसाठी ‘फेस्टिव्हल मार्केट’ची स्वतंत्र जागा असेल. सावंतवाडीच्या प्रसिद्ध हस्तकलेसाठी (हॅण्ड क्राफ्ट) आणि स्थानिक कलावंतांसाठी या आराखड्यात हक्काची जागा निश्चित करण्यात आली आहे. ‘रतन जे. बटलिबोई कन्सल्टंट्स प्रा. लि.’ आणि ‘ईडन एलएलपी’ यांच्या सहकार्याने हा दर्जेदार आराखडा तयार करण्यात आला असून, आपल्याच कारकिर्दीत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
सांस्कृतिक चळवळीसाठी ‘ओपन एम्पीथिएटर‘
मोती तलावाचा गणेश विसर्जनाचा भाग हा पर्यटकांसाठी मुख्य ‘व्हिव पॉईंट’ म्हणून विकसित केला जाईल. स्थानिक कला प्रकारांना व संस्कृतीला वाव देण्यासाठी थेट राजवाड्याच्या समोरील भागात एक भव्य ‘ओपन एम्पीथिएटर’ (खुले नाट्यगृह) उभारण्याची संकल्पना आहे. याशिवाय, पर्यटकांना तलावाच्या काठावर बसून सौंदर्याचा आस्वाद घेता यावा यासाठी ऐतिहासिक टच असलेली बैठक व्यवस्था, लहान मुलांसाठी विशेष पार्क आणि ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी सोयीस्कर आसनव्यवस्था केली जाणार आहे.
शहराबाहेरचा पर्यटक शहरात वळवणार: युवराज लखमराजे भोंसले
३१ एकर विस्तीर्ण परिसरामध्ये पसरलेला हा मोती तलाव सावंतवाडीची खरी शान आहे, असे सांगत युवराज लखमराजे भोंसले म्हणाले की, या तलावाला ‘ग्लोबल’ (जागतिक) स्तरावर ओळख मिळवून देणे हे आमचे ध्येय आहे. महामार्गावरून शहराबाहेरून जाणारा पर्यटक या सौंदर्याकडे आकर्षित होऊन थेट सावंतवाडी शहरात कसा येईल, यादृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरेल. या भव्य प्रकल्पासाठी शासनाकडून जास्तीत जास्त निधी मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.













