गोमयधारित अँटी रेडिशन चीपचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते अनावरण 

समाजात गोसेवेबाबत जागृती निर्माण करण्यासाठी असे उपक्रम महत्त्वपूर्ण : पालकमंत्री नितेश राणे यांचे गौरवोद्गार 

अमित खोत | मालवण : भारतीय संस्कृतीत गाईला विशेष महत्त्व असून गोसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांची समाजाला आवश्यकता आहे. गोमयपासून तयार करण्यात आलेली अँटी रेडिशन चीप हा त्याच दिशेने एक प्रेरणादायी आणि अभिनव प्रयत्न असल्याचे गौरवोद्गार मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले.

 

गोसेवा गतिविधी सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या गोमयधारित अँटी रेडिशन चीपचे अनावरण पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते कणकवली येथील ओम गणेश निवास्थानी करण्यात आले. यावेळी त्यांनी या अभिनव संकल्पनेचे विशेष कौतुक करत, अशा सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना शासन स्तरावर आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

 

यावेळी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, “गोमयचा उपयोग करून तयार करण्यात आलेली ही चीप भारतीय परंपरा आणि आधुनिक विज्ञान यांचा सुंदर संगम आहे. या माध्यमातून गाईंचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी निश्चितच बळ मिळेल. समाजात गोसेवेबाबत जागृती निर्माण करण्यासाठी असे उपक्रम महत्त्वपूर्ण ठरतील.”

 

सिंधुदुर्ग जिल्हा गोसेवा गतिविधी संयोजक चंद्रशेखर पुनाळेकर यांनी या अँटी रेडिशन चीपच्या निर्मितीची माहिती देताना सांगितले, गोमयचा विविध पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी उपयोग समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू असून, स्वदेशी संकल्पनांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. तसेच भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटरकडून अँटी रेडिशन चीप उत्तम असल्याबद्दल प्रमाणपत्र प्राप्त झालं आहे.

 

या कार्यक्रमास भाजपा एनजीओ आघाडी जिल्हा संयोजक भालचंद्र राऊत, शिवसेना मच्छिमार आघाडी जिल्हाप्रमुख राजेंद्र गावकर,

भाजपा मालवण शहराध्यक्षा तथा नगरपरिषद महिला बालकल्याण सभापती अन्वेशा आचरेकर, नगरसेविका मेघा सावंत गावकर, सीए अशोक सारंग तसेच शिवाजीराव घोगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी गोसेवा, पर्यावरण संवर्धन आणि स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देणाऱ्या अशा उपक्रमांचे स्वागत केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोसेवा गतिविधीच्या माध्यमातून सामाजिक, पर्यावरणपूरक आणि जनजागृतीपर विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.