लाखो रुपयांचा गुटखा जप्त मात्र आरोपी अजूनही मोकाट; संगमेश्वर पोलीसांसमोर आव्हान

देवरूख (प्रतिनिधी)

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर परिसरात ५ लाख ४६ हजार रुपयांचा गुटखा जप्त करूनही तब्बल तीन दिवस उलटले आहेत. मात्र या प्रकरणातील संशयित आरोपी अद्यापही फरार असल्याने नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे.

पोलीसांनी संशयित वाहनाचा पाठलाग करून मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त केला होता. मात्र चालक वाहन सोडून पसार झाल्याने तपासात अडथळे निर्माण झाले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात गुटखा वाहतूक होत असताना यामागील मुख्य सूत्रधार कोण, गुटखा कुठून आणला जात होता आणि तो कुठे पोहोचविण्यात येणार होता याबाबत आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. घटनेनंतर पोलीसांकडून तपास सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी अद्याप आरोपीला अटक न झाल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित आरोपींचा लवकर शोध घेऊन संपूर्ण रॅकेट उघड करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. दरम्यान, अन्न व औषध प्रशासन विभाग आणि पोलीस यंत्रणा यांच्याकडून पुढील तपास सुरू असून या प्रकरणात आणखी काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.