मर्डर करा नाही तर काही करा…!

कोणीही ग्रामस्थ, नागरिक पोलिस स्टेशनला जातो ते न्याय मागण्यासाठी जात असतो. अलिकडच्या काळात पोलिस स्टेशनला गेल्यावर कोणाला किती न्याय मिळतो हा खरतर संशोधनाचाच विषय आहे. पूर्वीचा पोलिसांचा धाक आणि वचक आज उरला नाही. त्याची अनेक कारणे आहेत. राजकिय होणारा हस्तक्षेप. खाकीवर्दीचे अवैध व्यवसायिकांशी असलेले सोटेलोटे आणि कर्तव्यभावनेचा पडलेला विसर अशा अनेक कारणांमुळे पोलिस स्टेशनला तक्रार घेऊन जाणाऱ्याला न्याय मिळेल किंवा त्याच म्हणन एैकूण घेतलं जाण्याची शक्यता फारच कमी आहे. पूर्वी एक प्रचलित म्हण होती आणि आजही ती म्हण आहे. ‘शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये’ असे म्हटले जाते. त्याचं कारणही तसच आहे. न्यायालयात एखादी केस गेल्यावर किती वर्षे न्यायालयात केस चालेल आणि न्याय मिळेल हे सांगता यायचे नाही. यामुळेच बहुधा कोर्टाची पायरी न चढण्याची म्हण समाजात प्रचलित झाली असावी. परंतु आज कोणीही आपल्यावर अन्याय होतोय म्हणून कुठल्या पोलिस स्टेशनला जावं अशी स्थिती निश्चितच नाही. कोणावरचा अन्याय दूर करण्याची कर्तव्य भावनाच नाही. त्यामुळे कोणी तक्रार पोलिस स्टेशनला जायला तयार होत नाही. ही वस्तुस्थिती कुणालाही नाकारता येणारी नाही. त्यामुळेच चोरी होऊनही चोरीची तक्रार द्यायला कोणी पोलिस स्टेशनला जात नाही. कितीतरी वेळा चोरी होऊनही चोरीच्या तक्रारी पोलिस स्टेशनला दिल्या जात नाहीत. त्याच कारणही पुन्हा तेच आहे. पोलिस चोरीचा तपास करत नाहीत हे जनतेलाही माहिती झालं आहे. ‘पोलिस तपास चालू आहे’ या एकाच वाक्यामध्ये पोलिसांच तपासकाम गुंडाळलेल असत. जनतेला या सगळया बद्धल चांगलीच कल्पना आहे.

दोन दिवसांपूर्वी बांदा पोलिस स्टेशनमधील पोलिस उपनिरीक्षक शिवराज झांझुर्डे यांनी बांदा पोलिस स्टेशनला तक्रार द्यायला आलेल्या तक्रारदाराला मर्डर करून या मग बघतो. कदाचित कास गावातील एका कुटुंबातील माना-पानाच्या विषयाचा वाद अनेकवेळा पोलिसांकडे आला असेल. त्यातूनही पोलिस उपनिरीक्षक शिवराज झांझुर्डे यांनी वैतागून हे वाक्य बोलले असतीलही परंतु पोलिस स्टेशनमधील कोणीही शिपाई असेल किंवा पोलिस उपनिरीक्षक, पोलिस निरीक्षक यात कोणीही येणाऱ्या तक्रारदाराशी असं काही बोलणं अयोग्य आहे. त्यामुळे बांदा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक शिवराज झांझुर्डे यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये जरी तक्रारदाराला जावा मर्डर करा नाही तर आणखी काही करा म्हणून सांगणे निश्चितच अयोग्यच आहे. शेवटी पोलिसांनी, अधिकाऱ्यांनी सर्वसामान्यांशी बोलताना, वागताना निश्चितच त्याच भान ठेवण आवश्यक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट पोलिसांची विश्वासार्हता आणि पोलिसांचा धाक या दोन्ही गोष्टी कमी होत चालल्या आहेत. याच कारणही तसच आहे. कर्तव्यदक्षतेपेक्षा आणखी अनेक गोष्टींना महत्व देत काम करण्याची नवी कार्यपद्धती पोलिस दलात वाढलेली आहे. कायदा आणि नियम पाळून काम करण्याची कार्यपद्धती असेल तर असे प्रश्नच निर्माण होणार नाहीत. परंतु अलिकडे पोलिसदलात आणि समाजातही या सर्वांचाच अभाव आहे.