गांजा विक्री व बाळगल्याप्रकरणी आरोपीला न्यायालयीन कोठडी
कणकवली : शहरातील बांधकरवाडी येथे भाड्याच्या घरात सुरू असलेल्या अवैध गांजा विक्रीवर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी रविवारी भल्या पहाटे ४ वा. च्या सुमारास करण्यात आलेल्या कारवाईत शुभम उर्फ कुंदन संतोष गोसावी ( वय २०, कणकवली – बांधकरवाडी) याला एलसीबीच्या पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडून तब्बल ३८० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. शुभम याने विक्रीच्या उद्देशाने भाड्याने राहत असलेल्या घरामध्ये गांजा ठेवला असल्याची माहिती एलसीबीच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक आनिल हाडळ यांच्या नेतृत्वाखाली एलसीबीची टीम बांधकरवाडी येथे पोहोचली. अनिल हाडळ यांनी सदर घराचा दरवाजा ठोठावून संशयित शुभम उर्फ कुंदन याला उठवले. त्यानंतर त्याच्या घराची झडती घेतली. दरम्यान यावेळी हॉलमधील एका बॅरेलमध्ये कपड्यांखाली लपवलेली गांजाची तब्बल ३० पाकिटे आढळून आली होती. या प्रकरणी शुभम उर्फ कुंदन संतोष गोसावी याला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीस कोठडी संपल्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने शुभम उर्फ कुंदन संतोष गोसावी याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. या घटनेचा अधिक तपास कणकवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर सावंत करत आहेत.












