बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. राजुरा शिवारात सापडलेल्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख शिवानी कळमेकर अशी करून तिच्या वडिलांना आणि भावाला अटक करण्यात आली होती. मात्र तब्बल २२ दिवसांनंतर शिवानी स्वतः जिवंत अवस्थेत पोलिसांसमोर हजर झाली. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाला अनपेक्षित वळण मिळाले असून पोलिसांच्या तपास पद्धतीवर टीका होत आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या बाप-लेकांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
२२ दिवसांनंतर शिवानी जिवंत आल्याने खळबळ
बुलढाणा : जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील राजुरा शिवारात २६ एप्रिल रोजी एक अर्धवट जळालेला आणि शिर नसलेला मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाची ओळख मध्य प्रदेशातील शिवानी कळमेकर अशी करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणात तिचे वडील बापूराव कळमेकर आणि भाऊ अजय कळमेकर यांना अटक केली होती. मात्र, तपासाला धक्का देणारी घटना घडली आणि तब्बल २२ दिवसांनी शिवानी स्वतः जिवंत अवस्थेत पोलिसांसमोर हजर झाली. त्यामुळे संपूर्ण प्रकरणावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
चुकीच्या ओळखीमुळे पोलिसांची मोठी अडचण
तपासादरम्यान पोलिसांनी दावा केला होता की शिवानी कळमेकर विवाहित असूनही ती तिच्या प्रियकराला भेटत होती आणि त्यातूनच तिची हत्या करण्यात आली. तसेच तिचा मृतदेह राजुरा धरण परिसरात आणून टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. या आधारावरच तिच्या वडिलांना आणि भावाला अटक करण्यात आली होती. मात्र शिवानी जिवंत असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांच्या या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, अर्धवट जळालेला मृतदेह सापडल्यानंतर फॉरेन्सिक पथक आणि पोलिसांनी घटनास्थळी तपास केला होता. पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनीही या प्रकरणाचा छडा लावल्याचा दावा केला होता. मात्र प्रत्यक्षात शिवानी जिवंत असल्याने तपासातील अनेक बाबींवर आता संशय व्यक्त केला जात आहे.
माहितीनुसार, शिवानी तिच्या प्रियकरासोबत मध्य प्रदेशातील बुरहानपूर परिसरात राहत होती. ती जिवंत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अटक करण्यात आलेल्या बापूराव कळमेकर आणि अजय कळमेकर यांची मुक्तता करण्यात आली आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या तपास पद्धतीवर टीका होत असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याबाबत पोलिसांकडून स्पष्टीकरण देताना सांगण्यात आले की, सापडलेल्या अज्ञात महिलेच्या मृतदेहाची ओळख निश्चित करण्यासाठी डीएनए नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या तपासाचा अंतिम अहवाल आल्यानंतरच पुढील निष्कर्ष स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.










