हिमवृष्टीचा कहर; वाहतूक आणि वीजपुरवठा विस्कळीत
लाहुल-स्पिती, शिमला, कुल्लूला सर्वाधिक फटका
हिमाचल प्रदेशात शुक्रवारी पावसासह झालेल्या तीव्र हिमवृष्टीमुळे राज्यातील दैनंदिन जीवन जवळजवळ ठप्प झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये रस्ते बंद पडले असून वीजपुरवठा खंडित झाला आहे. अचानक बदललेल्या हवामानामुळे प्रवासावर निर्बंध लावण्यात आले आहेत. लाहुल-स्पिती, शिमला आणि कुल्लू या भागांना सर्वाधिक फटका बसला आहे. प्रशासनाने नागरिकांना आणि पर्यटकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.
शिमला : हिमाचल प्रदेशात जोरदार पाऊस आणि तीव्र हिमवृष्टी झाल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर (SEOC) च्या आकडेवारीनुसार अतिवृष्टी आणि हिमवृष्टीमुळे राज्यातील 563 रस्ते सध्या वाहतुकीसाठी बंद आहेत. NH-03 आणि NH-50 सारखे महत्त्वाचे राष्ट्रीय महामार्गही यापासून सुटलेले नाहीत.
वीजपुरवठा मोठ्या प्रमाणात खंडित झाला असून राज्यभरात 4,797 वितरण ट्रान्सफॉर्मर अकार्यक्षम झाले आहेत. लाहुल आणि स्पिती जिल्ह्यातील परिस्थिती सर्वाधिक गंभीर असून येथे जोरदार हिमवृष्टीमुळे सुमारे 290 रस्ते बंद पडले आहेत. यामध्ये कोकसर-रोहतांग पास, दारचा-सरचू रस्ता आणि ग्रामफू-बाटल रस्ता यांचा समावेश आहे, त्यामुळे हा आदिवासी जिल्हा शेजारील भागांपासून अधिकच अलग झाला आहे.
चंबा जिल्ह्यालाही मोठा फटका बसला असून पांगी, तिस्सा, सलूनी आणि भरमौर भागात 105 रस्ते बंद झाले आहेत. उना जिल्ह्यात 70, तर मंडी जिल्ह्यात 64 रस्ते अवरोधित झाले आहेत. अन्य बाधित जिल्ह्यांमध्ये सिरमौरमध्ये 20, कुल्लूमध्ये 9, कांगडामध्ये 4 आणि सोलनमध्ये 1 रस्ता बंद असल्याची माहिती आहे. बिलासपूर आणि हमीरपूर हे दोनच जिल्हे तुलनेने सुरक्षित राहिले आहेत.
शिमला जिल्ह्यात हवामान अत्यंत कठोर राहिले. जिल्हा आपत्कालीन कार्यालयातच वीज नसल्यामुळे रस्त्यांची संपूर्ण पाहणी करता आली नाही. शिमला हवामानशास्त्र कार्यालयने दिलेल्या माहितीनुसार शहरातील तापमान सामान्य पातळीपेक्षा मोठ्या प्रमाणात खाली गेले. साधारण 3°C ते 11°C या नेहमीच्या श्रेणीऐवजी किमान तापमान 0°C आणि कमाल 0.6°C इतके नोंदवले गेले. शहरात दिवसभरात सुमारे 25 सेंटीमीटर बर्फवृष्टी झाली.
कुल्लू जिल्ह्यात ताज्या हिमवृष्टीमुळे सुमारे 45 सेंटीमीटर म्हणजेच दीड फूट बर्फ साचला आहे. यामुळे प्रमुख रस्त्यांवरील वाहनांची हालचाल तात्पुरती स्थगित करण्यात आली. पाटलीकुहल परिसरात 6 सेंटीमीटर बर्फवृष्टी झाली, तर बंजार, सेंज, अन्नी आणि निर्मंद भागात पाऊस पडला.
18 माईल पॉईंटजवळ प्रचंड बर्फ साचल्यामुळे झिरी आणि मनाली दरम्यानच्या NH-03 मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. खबरदारीचा उपाय म्हणून मनाली–अटल बोगदा–रोहतांग रस्ताही बंद करण्यात आला. तसेच NH-305 च्या औट–लुहरी विभागात काही ठिकाणी तीन फूटांपर्यंत बर्फ साचल्याने मार्ग बंद झाला आहे.
दरम्यान, मणिकरण गुरुद्वाराजवळ एक झाड कोसळल्याने भुंतर–मणिकरण रस्ता (DMR-30) बंद झाला आणि स्थानिक वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. रामशिला (कुल्लू) येथून मनालीकडे जाणारा डाव्या तीराचा मार्ग अधिकृतरीत्या खुला असला तरी धोकादायक परिस्थितीमुळे मनालीकडे जाणाऱ्या गाड्या पाटलीकुहल येथेच थांबवण्यात आल्या. प्रहार डिजिटलशी बोलताना अधिकाऱ्यांनी हवामान सुधारल्यानंतर रस्ते साफसफाई आणि पुनर्संचयित कामे हाती घेतली जातील, असे सांगितले.
अधिकाऱ्यांनी रहिवासी आणि पर्यटक यांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि अधिकृत सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.










