‘मन की बात’च्या निमित्ताने सावंतवाडीत भाजपची वॉर्ड भेट

नगराध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या जनतेच्या समस्या

​सावंतवाडी । प्रतिनिधी :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचे औचित्य साधून सावंतवाडी शहरात भाजपच्या वतीने विशेष उपक्रम राबवण्यात आला. नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले आणि उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्यासह भाजपच्या सर्व नगरसेवकांनी व सभापतींनी शहरातील १० ही प्रभागांमध्ये (वॉर्ड) प्रत्यक्ष जाऊन जनतेच्या समस्या जाणून घेतल्या.

​शहरातील विविध बुथ प्रमुखांच्या निवासस्थानी ‘मन की बात’ कार्यक्रमाचे सामूहिक आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.

​जनतेच्या दारी जाऊन संवाद
नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी काही दिवसांपूर्वीच प्रभागनिहाय भेट देऊन जनतेचे प्रश्न सोडवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार ‘मन की बात’ कार्यक्रमाचे निमित्त साधून या वॉर्ड भेटींना अधिकृतपणे सुरुवात करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा व उपनगराध्यक्षांनी स्वतः प्रभागांमध्ये फिरून नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या स्थानिक समस्या, अडचणी समजून घेतल्या.

​नियोजन आणि उपस्थिती
या संपूर्ण उपक्रमाचे आयोजन भाजप शहर मंडळ अध्यक्ष सुधीर आडीवरेकर आणि ‘मन की बात’ कार्यक्रमाचे संयोजक सभापती प्रतीक बांदेकर यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.

​या वॉर्ड भेटी दरम्यान नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, युवराज लखमराजे भोंसले, सभापती सुधीर आडीवरेकर, सभापती प्रतीक बांदेकर, आनंद नेवगी, सुनिता पेडणेकर यांच्यासह भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रभागांमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपच्या या जनसंपर्क मोहिमेला शहरात उत्स्फूर्त सहभाग लाभल्याचे पाहायला मिळाले.