​सावंतवाडी-कुडाळ रोडवर अपघात ; कोलगाव येथील ६२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

​सावंतवाडी:
सावंतवाडी-कुडाळ रोडवर कामाक्षी स्टील यार्डसमोर काल शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या समोरासमोर भीषण अपघातात एक जण गंभीर जखमी झाला होता. राजाराम परशुराम सावंत (वय ६२, रा. कोलगाव) असे त्यांचे नाव असून, उपचारादरम्यान गोव्यातील बांबोळी येथील रुग्णालयात त्यांचे निधन झाले. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​ याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी ८ वाजताच्या सुमारास श्री. संजीवन कारवडेकर हे आपल्या चारचाकी वाहनाने सावंतवाडी-कुडाळ रस्त्यावरून जात होते. दरम्यान, कामाक्षी स्टील यार्डसमोर त्यांच्या चारचाकी वाहनाने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीस्वार राजाराम परशुराम सावंत हे रस्त्यावर कोसळले आणि त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली.

​अपघातानंतर घटनास्थळावर स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेतली. जखमी सावंत यांना तात्काळ प्रथमोपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी तात्काळ गोव्यातील बांबोळी येथील रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, तेथे उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

​या अपघाताची नोंद रात्री उशिरा सावंतवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार श्री. राऊत करीत आहेत. या अपघातामुळे कोलगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.