लांजा एसटी आगारात एसटी बस आणि कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता

४३० रूटवर गाड्या चालवताना प्रशासनाची होतेय तारेवरची कसरत

संतोष कोत्रे
लांजा-: आवश्यकतेपेक्षा कमी असलेल्या एसटी बस, स्क्रॅब मध्ये जाणाऱ्या एसटी बस आणि त्यात भरीसभर म्हणून कर्मचाऱ्यांची असलेली मोठी कमतरता यामुळे तालुक्यातील विविध गावातील विविध मार्गांवरील ४३० फेऱ्या चालवण्याचे कठीण आव्हान पेलताना लांजा एसटी आगाराची दमछाक होत आहे. यामुळेच हंगामी काळात देखील मुंबईसारख्या लांब पल्याच्या गाड्या सोडणे कठीण होऊन बसते. तर बऱ्याचदा विविध मार्गावरील बसफेऱ्या या अचानक बंद करण्याची नामुष्की आगारावर येऊन ठेवते. त्यामुळे प्रवाशांच्या रोशाला आगार व्यवस्थापक व अन्य अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागते. गेल्या अनेक वर्षांपासूनचे हे चित्र कायम आहे. त्यामुळे आगामी काळात नव्या गाड्यांच्या उपलब्धतेसह आवश्यक त्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची भरती होऊन लांजा आगाराला लागलेले हे बस आणि कर्मचारी कमतरतेचे ग्रहण सुटणार का? हा प्रश्नच आहे.
मुंबई गोवा महामार्गावर वसलेल्या लांजा बस स्थानकामध्ये प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. शालेय विद्यार्थी, मुंबईकर चाकरमानी, कामधंद्याच्या निमित्ताने प्रवास करणारे प्रवासी यांनी लांजा एसटी बस स्थानक नेहमीच गजबजलेली असते. मात्र गेल्या काही वर्षांपासून लांजा एसटी आगाराचा कारभार हा विस्कटलेला आणि त्यात सुसूत्रता नसल्याचे दिसून येत आहे. विविध ग्रामीण मार्गावरील बसफेरी अचानक बंद केली जाते. हंगामी काळात लांजा शहरातून मुंबई मार्गावर दररोज आठ ते दहा खासगी बस सुटतात. पण एसटीचा केवळ एक ते दोन बस सोडतात. यामागे नेमके गौडबंगाल काय आहे? एसटी बसला नेमके तोट्यात कोण घालते आहे? हे जाणून घेण्याचा कोणी प्रयत्न करत नाही. याचे सर्व खापर अधिकाऱ्यांवर फोडून जो तो मोकळा होतो.
मुळातच लांजा एसटी आगाराकडे एसटी बसचा तुटवडा आहे. ४८ बस ची आवश्यकता असताना सद्यस्थितीत केवळ ४१ बस आगाराकडे उपलब्ध आहेत. यापूर्वी उपलब्ध असलेल्या ४७ बस पैकी सहा गाड्या या स्क्रॅपमध्ये गेल्या आहेत. या ४१ पैकी केवळ १० गाड्या नवीन आहेत. उर्वरित ३१ गाड्या जुन्या असून बऱ्यापैकी सुस्थितीत आहेत. लांजा आगाराच्या एकूण ४२० फेऱ्या (जाऊन येऊन) असून त्यापैकी ३३० फेऱ्या या लोकल मार्गावर सोडल्या जातात. या ३३० फेऱ्या चालवण्यासाठी ४७ गाड्यांची आवश्यकता भासते. (एखादी गाडी बंद पडली तर उपलब्ध असलेली ४८ वी बसगाडी अड्जस्ट करता येते) सध्या सहा बस कमी असल्याने या रूटवर गाड्या चालवताना आगार प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते आहे. सध्या शाळा महाविद्यालय बंद असल्याने सध्याची परिस्थिती निभावून जात आहे. मात्र शाळा कॉलेज सुरू झाल्यानंतर बसच्या कमतरतेमुळे विविध ग्रामीण भागातील ३३० फेऱ्या सोडताना आगार व्यवस्थापनासमोर मोठे आव्हान उभे ठाकणार आहे किंबहुना त्यांची पूरती भंबेरी उडणार आहे. यातून लांजा आगार प्रशासन कसा मार्ग काढणार हा प्रश्नच आहे.
आगारासाठी नवीन सहा गाड्या उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने आगार व्यवस्थापिका श्रीम. काव्या पेडणेकर यांनी वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव सादर केलेला आहे. मात्र वरिष्ठ स्तरावरून त्यांना कितपत प्रतिसाद मिळतो यावरच सर्व कही अवलंबून असणार आहे. लांजा आगारातील एसटी बस बरोबरच कर्मचाऱ्यांचा देखील मोठा तुटवडा आहे. आगारात नवीन कर्मचारी भरती झालेले नाही. त्यात सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जागी नवीन कर्मचारी नियुक्त केला जात नाही. लांजा एस टी आगाराला ६० ते ६५ कर्मचारी यांची आवश्यकता असताना सद्यस्थितीत केवळ ३० ते ३५ कर्मचारीच उपलब्ध आहेत. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे लोकल ३३० फेऱ्या सोडायच्या कशा? एखाद्या मार्गावर बस एडजेस्ट केली तरी कर्मचारी (एस टी बस चालक- वाहक) आणायचे कुठून? हा देखील प्रश्नच आहे. शाळा महाविद्यालय सुरू झाल्यानंतर हा प्रश्न गंभीर रूप धारण करणार आहे. आगाराची पुरती बोंबाबोंब होणार आहे.
अशाप्रकारे ३० ते ३५ नवीन कर्मचारी भरती आणि ०६ एसटी बस उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कार्यवाही झाल्यानंतरच लांजा आगाराच्या विस्कटलेल्या कारभाराची घडी बसवण्यात यश येणार आहे. अन्यथा येरे माझ्या मागल्या प्रमाणे लांजा एसटी आगाराचा कारभार चालणार आहे. वरिष्ठ प्रशासन स्तरावरून या दृष्टीने कार्यवाही होणे अपेक्षित आहे. रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आलेले राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे याबाबत कार्यवाही करतील का? हे हे पुढील काळात स्पष्ट होणार आहे.