हरळ वारेवाडी येथील बांबूने मारहाण प्रकरणी चौघांना सहा महिन्यांची कैद व दहा हजार रूपये दंडाची शिक्षा

राजापूर | प्रतिनिधी बांबूने मारहाण करून फिर्यादीस दुखापत केल्याप्रकरणी राजापूर न्यायालयाने चार जणांना सहा महिन्यांची साधी कैद आणि एकत्रित रूपये दहा हजार दंडाची शिक्षा सुनावली आहे. राजापूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एस. एस. हाके यांनी सदरची शिक्षा सुनावली आहे.

आत्माराम लक्ष्मण शिंदे, शांताराम लक्ष्मण शिंदे, अनिल आत्माराम शिंदे व अजित आत्माराम शिंदे, सर्व रा. हरळ वारेवाडी ता. राजापूर अशी या शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणी प्रतीक प्रभाकर शिंदे यांनी तक्रार दाखल केलेली होती. आरोपी हरळ वारेवाडीमधील विहीरीवर त्यांच्या म्हशी धुत असताना फिर्यादी प्रतीक प्रभाकर शिंदे यांनी त्यांना ‘तुम्ही विहीरीवर म्हशी का धुताय, तुम्ही म्हशी धुतल्या तर पिण्यासाठी पाणी पुरणार नाही’, असे सांगितले. त्याचा राग येऊन आत्माराम लक्ष्मण शिंदे आणि अनिल आत्माराम शिंदे यांनी त्यांना बांबूने डोक्यावर, डाव्या हातावर व बोटांवर मारहाण करुन दुखापती केल्या. अजित आत्माराम शिंदे यांनी फिर्यादी यांची बहीण हेमांगी प्रभाकर शिंदे यांना हाताचे थापटाने मारहाण करुन धकलाबुकल केली व शिवीगाळी केली तर शांताराम लक्ष्मण शिंदे यांनी फिर्यादी यांचे वडील प्रभाकर सीताराम शिंदे यांना बांबूने पाठीवर व पायावर मारहाण केली व धकलाबुकल करुन शिवीगाळी केली. या प्रकरणी प्रतीक प्रभाकर शिंदे यांनी तक्रार दाखल केलेल्या तक्रारीवरून राजापूर पोलीसांनी या आरोपींच्या विरुद्ध भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ व ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता.

याप्रकरणी तत्कालीन तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र चव्हाण यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणी सरकार पक्षाच्या वतीने विशेष सहाय्यक सरकारी वकील ओंकार गांगण यांनी ९ साक्षीदार तपासले. सहाय्यक सरकारी वकील भालचंद्र सुपेकर यांनी अंतिम युक्तिवाद केला. कोर्ट पैरवी म्हणून प्रथमेश उकार्डे व सचिन बळीप यांनी काम पाहिले.

या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष, त्याला पुष्टी देणारे वैद्यकीय प्रमाणपत्र हा पुरावा विश्वासार्ह मानला. तसेच सदर प्रकरणात फिर्यादीचा रक्तगट व फिर्यादीचे कपडे व बांबूवरील रक्त नमुन्याविषयी रासायनिक विश्लेषणाच्या अहवालातूनही सकारात्मक पुरावा समोर आला आहे. त्यामुळे आरोपींनी फिर्यादीस मारहाण करुन जबर दुखापत केली ही बाब सबळ पुराव्यानिशी निःसंशयपणे सिद्ध केली असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले व या आरोपींना शिक्षा सुनावली आहे.