दापोलीतील तीन मंदिरांतून पितळी घंटांची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

दापोली : दापोली तालुक्यात चोरट्यांनी आपला मोर्चा आता देवस्थानांकडे वळवला असून, खेर्डी येथील तीन मंदिरांमधील पितळी घंटांची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही चोरी ३० जानेवारी २०२६ च्या सकाळी १०:०० वाजेपासून ३१ जानेवारी २०२६ च्या सकाळी ०८:०० वाजेच्या दरम्यान घडली आहे. चोरट्यांनी खेर्डी येथील नवीन श्री चंडिका देवी मंदिर, जुने श्री चंडिका देवी मंदिर आणि श्री सोमय्या देवस्थान या तीन मंदिरांना लक्ष्य करत एकूण चार पितळी घंटा चोरून नेल्या आहेत.

या चोरीमध्ये सुमारे २७,००० रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. यामध्ये ६,००० रुपये किमतीची १२ किलो वजनाची एक पितळी घंटा आणि प्रत्येकी १८ किलो व १२ किलो वजनाच्या इतर तीन घंटांचा समावेश आहे. या प्रकरणी मंदिराचे व्यवस्थापन पाहणारे ६१ वर्षीय रामचंद्र श्रीपत जाडे यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मंदिर कमिटीच्या निर्णयानंतर तक्रार दाखल करण्यास काही अवधी लागला असला तरी, पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५ (ड) अंतर्गत अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.