चार वर्षांपूर्वी याच भागात झाले होते भूस्खलन
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील सह्याद्री पट्ट्यात असलेल्या शिरशिंगे गोठवेवाडी येथील डोंगरावर भेगा पडल्यामुळे माळीण किंवा इर्शाळवाडीसारखी दूर्घटना होण्यापूर्वी आमचे पुनर्वसन करा अशी मागणी करीत या भागातील ९३ जणांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांना निवेदन दिले. सदर निवेदनावर तात्काळ कारवाई न झाल्यास होणार्या मनुष्य व वित्त हानीस सर्वस्वी शासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी, असे या निवेदनात म्हटले आहे.
शिरशिंगे गोठवेवाडी येथे डोंगराळ भागात लोकवस्ती असून येथील दरवर्षी पावसाळ्याच्या दरम्यान डोंगर खचणे, जमिनीला भेगा पडणे, लहान दरडी कोसळणे असे प्रकार होऊन येथील जिवीतहानी व वस्तीवरील घरांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शासनस्तरावरून दरवर्षी संबंधीत भागात राहणाऱ्या कुटुंबांना नोटीसा देण्यात येतात.
या भागात ६ ऑगस्ट २०१९ रोजी
भुस्खलनाची घटना घडली होती. याला पाच वर्ष पूर्ण झाली. शासन स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करूनही अद्याप शासनाकडुन कोणतीही कार्यवाही झालेली नाही. या बाबत .३० जून २०२२ रोजी संबंधीत दरडप्रवण क्षेत्रातील लोकांचे पुर्नवसन करण्याबाबत तहसिलदार यांना निवेदन सादर करण्यात आले होते. त्याचा शासन स्तरावरून अद्याप कोणतेही कार्यवाही झालेली नाही.
त्यास अनुसरून संबंधीत भागात राहणाऱ्या लोकांचे योग्य ठिकाणी पुर्नवसन – स्थालांतरण करण्यात यावे. सदर पुर्नवसनासाठी लागणारी जागा गावाच्या हददीत सर्वे नं २७/१ (सामाईक) मध्ये तीन ने चार ठिकाणी उपलब्ध आहे. त्या जागेची शासन स्तरावरून पाहणी करून संपादनाबाबत कार्यवाही करून बाधीत कुटुंबांचे तात्काळ पुर्नवसन करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. तसेच सदर निवेदनावर तात्काळ कारवाई न झाल्यास होणाऱ्या मनुष्य व वित्त हानीस सर्वस्वी जबाबदार शासन राहील याची नोंद घ्यावी, असे या निवेदनात म्हटले आहे.
तहसीलदार श्रीधर पाटील यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर भुगर्भशास्त्रज्ञा मार्फत सर्वेक्षण करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पुनर्वसनाबाबत निर्णय घेईल. तसेच भूजल सर्वेक्षण आणि पुनर्वसन बाबतीत पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन संबंधितांना दिले. यावेळी शिरशिंगे सरपंच दिपक राऊळ, माजी सरपंच नारायण राऊळ, सुरेश शिर्के, जीवन लाड, उत्तम शिर्के, प्रभाकर घावरे, सिताराम सुर्वे, अनंत शिर्के, वसंत घावरे, प्रशांत देसाई, दिपक शिर्के,भिवा शिर्के, गणू राऊळ, बाळकृष्ण पेडणेकर आदी उपस्थित होते.










