राजापूर | प्रतिनिधी : विविध कारणांमुळे रिक्त राहीलेल्या तालुक्यातील 16 ग्रामपंचायतीतील रिक्त सदस्य पदांच्या पोटनिवडणूकीसह जुवे-जैतापूर ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांचे पडघम वाजू लागले आहेत. त्यादृष्टीने महसूल प्रशासनाकडून पूर्वतयारी हाती घेण्यात आली आहे.या पोटनिवडणूकीसह सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने मतदार याद्या त्या-त्या ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती महसूल प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
विविध कारणांमुळे रिक्त राहीलेल्या ग्रांमपंचायतीच्या विविध जागांसाठी पोटनिवडणूका घेण्याच्या हालचाली निवडणूक विभागाकडून सुरू झाल्या आहेत. त्या अनुषंगाने मतदार याद्या जाहीर करून त्यांना निवडणूकीच्या अनुषंगाने अंतिम स्वरूप देण्याची प्रक्रीया निवडणूक विभागाकडून राबविली जात आहे. ग्रामपंचायत सदस्यपदांच्या पोटनिवडणूका होत असलेल्या तालुक्यातील सोळा तर, सार्वत्रिक निवडणूका होत असलेल्या एका ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
ज्या ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूका आणि सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत त्या-त्या ग्रामपंचायतींमध्ये प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यावर सोमवार 21 ऑगस्ट पर्यंत हरकती दाखल करायच्या असून दाखल झालेल्या हरकती आणि सूचना निकाली काढून शुक्रवारी 25 आगस्ट रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार असल्याची माहिती महसूल प्रशासनाकडून देण्यात आली.
ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी पोटनिवडणूका होत असलेल्या ग्रामपंचायतमध्ये मंदरूळ, वाल्ये, गोवळ, पांगरी खुर्द, वडदहसोळ, नाणार, झर्ये, कोळवणखडी, येळवण, हसोळतर्फ सौंदळ, ओझर, दसूर, रायपाटण, कुवेशी, खिणगिणी, मोंसम या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तर पंचवार्षिक मुदत संपल्याने सार्वत्रिक निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये तालुक्यातील एकमेव जुवे जैतापूर या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.












