मंडणगड शहराचा प्रारूप विकास आराखडा बाबत नगरपंचायतीत नगररचना अधिकारी यांच्या उपस्थित बैठकीचे आयोजन


बैठकीत शहरातील अनेकांनी मांडल्या हरकती व सूचना

मंडणगड l प्रतिनिधी,

– मंडणगड नगरपंचायतीचे शहराचे प्रारुप विकास आरखड्यासाठी प्रस्तावित जमीन वापर च्या (पीएलयु) (2019-44) प्रस्तावास नगर रचना कार्यालय असिस्टंट डायरेक्टर टाऊन प्लानींग रत्नागिरी यांनी 12 जून 2025 रोजी मान्यता दिली आहे. त्यानुसार आराखड्याच्या दुरुस्त्यांकरिता तसेच नागरीकांच्या हरकती व सुचना व विकास योजनेची माहिती देण्याकरिता 2 जुलै 2025 रोजी नगरपंचायत सभागृहात सहाय्यक संचालक नगररचना विभाग यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बैठकीत शहरातील नागरिकांनी आराखड्यातील दोष, त्रुटी दाखवत हरकती व सूचना मांडल्या.

यावेळी बैठकीस स्मिता कलकुटगी, सहाय्यक संचालक नगररचना विभाग, श्री. जगताप, सहायक नगर रचना अधिकारी, मुख्याधिकारी अभिजित कुंभार, नगराध्यक्षा सोनल बेर्डे यांच्यासह उपनगराध्यक्ष, नगरसेवक व शहरातील नागरिक उपस्थित होते. मंडणगड शहराचा विकास आराखड्यानुसार नुसार शहराचा विस्तार व विकासाच्या दृष्टीने नागरीकांनी केलेल्या सुचना व सुधारणांचा समावेश या आरखड्यात करता येणार आहे. त्यानंतर अंतीम मंजुरीसाठी आराखडा पुढे पाठवण्यात येणार आहे. याबाबत बैठकीत प्रारूप आराखड्यातील समाविष्ठ बाबींची माहिती देण्यात आली. आराखड्यात मंडणगड नगरपंचायत हद्दीतील जमीन क्षेत्रफळाची विविध झोनमध्ये करण्यात आलेल्या विभागणीमध्ये घेण्यात आलेली आरक्षणे याबाबत आयोजित बैठकीत चर्चा झाली मात्र घेण्यात आलेल्या अनेक आरक्षित जागांबाबत नागरिकांनी यावेळी हरकती घेतल्या. काही झोन साठी निश्चित करण्यात आरक्षणे खाजगी जागेत आल्यामुळे येथील जागा मालकांनी यावर हरकत घेत लेखी तक्रार दाखल केली आहे. शहरविकास आराखड्यातील तरतुदी आराखड्यानुसार नागरिकांना विस्तृतपणे अवगत होत नसल्याने प्रभाग निहाय विकास आरखडा नागरिकांना समजावण्यात यावा, प्रभागातील कोणत्या जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत याबाबत प्रभागात जनजागृती करावी अशीही मागणी यावेळी नागरिकांच्या वतीने करण्यात आली. तर शहरातील जागा अनेक हिस्स्यामध्ये विभागल्या गेल्या आहेत त्यामुळे कोणत्या सर्वे नंबर मध्ये कोणाच्या जागेवर आरक्षणे जाहीर झाली आहेत याबाबत नागरीकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाल्याने आरक्षणे हिस्स्यानुसार दाखवली जावीत, भूमी अभिलेख विभागाच्या वतीने सिटी सर्वे करून विकास आराखड्याचे योग्य नियोजन करण्यात यावे असे यावेळी काही नागरिकांनी सूचना मांडल्या. आराखड्यामध्ये समाविष्ठ करण्यात आलेल्या शहरातील रस्त्यांचे रुंदिकारांचा मुद्दा कळीचा ठरला या रस्त्यांच्या रुंदीकरणामुळे शहरातील अनेक घरे, दुकाने बाधित होत असल्याने याबातीत हरकती घेण्यात आल्या आहेत.

यावेळी सहाय्यक संचालक नगररचना यांनी शहर विकास आराखड्याबाबत समिती गठीत करण्यात येणार असून नागरिकांनी उपस्थित केलेल्या हरकती व सूचना समितीसमोर मांडण्यात येऊन हरकती व सूचनांचा प्राधान्यक्रमाने विचार केला जाईल व त्यानुसार अंतिम निर्णय होईल, असे सांगितले.