शिरोडा वेळागर समुद्रात बुडालेल्या गडहिंग्लज येथील पर्यटक विद्यार्थ्याचा मृतदेह किनाऱ्यावरच सापडला
वेंगुर्ले : दाजी नाईक
वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा वेळागर येथील समुद्रात मंगळवारी सायंकाळी आंघोळीसाठी उतरलेल्या पर्यटकांपैकी एक पर्यटक विद्यार्थी बुडाल्याची धक्कादायक घटना घडली होती. प्रणय ज्ञानेश्वर देवमाने वय २१ वर्ष राहणार गडहिंग्लज कोल्हापूर असे त्याचे नाव आहे. त्याचा मृतदेह आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास शिरोडा समुद्र किनारी दिसून आला.
पोलीस उपनिरीक्षक तुकाराम जाधव, पोलीस प्रसाद कदम, श्री मांजरेकर, श्रीमती दीपा मटकर, वेळागर पोलिस पाटील लक्ष्मण तांडेल, सागरतीर्थ पोलिस पाटील सनी मोरजकर, शिरोडा उपसरपंच चंदन हाडये, जीव रक्षक संजय नार्वेकर तसेच आबा चिपकर, बाबल गावडे ग्रामस्थ आणि नातेवाईक उपस्थित होते. किनाऱ्यावरून मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रेडी प्राथमिक आरोग्य केंद्र पाठविण्यात आला आहे.
गडहिंग्लज कोल्हापूर येथील सहा जण मित्र फिरण्यासाठी शिरोडा समुद्रकिनारी आले होते. यामध्ये प्रतीक शंकर बुगडे वय २० वर्षे, दर्शन सुरेश जानवरेकर वय २१ वर्षे, शिवम चंद्रशेखर मस्ती वय १९ वर्ष, विघ्नेश धोंडीबा दळवी २२ वर्ष, रितेश दीपक कांबळे वय २२ वर्ष आणि प्रणय ज्ञानेश्वर देवमाने वय २१ वर्षे हे शिरोडा वेळागर येथे मोटरसायकलने फिरण्यासाठी आलेले होते .त्यामधील प्रतीक शंकर बुगडे व प्रणय ज्ञानेश्वर देवमाने (नापत्ता) हे काल सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास समुद्राच्या पाण्यात आंघोळीसाठी आणि पोहण्यासाठी उतरले. त्यातील प्रणय ज्ञानेश्वर देवमाने वय २१ वर्ष राहणार गडहिंग्लज शेंद्री रोड तालुका कोल्हापूर हा समुद्राच्या पाण्याच्या लाटे बरोबर आत ओढला जाऊन समुद्राच्या पाण्यात नापता झालेला आहे.
*पाच जण बचावले*
समुद्र किनारी आल्यानंतर या सहा मित्रांपैकी दोघांना समुद्राच्या पाण्यात उतरून आंघोळ करण्याचा मोह आवरता आला नाही. त्यामुळे दोघे जण आंघोळीसाठी पाण्यात उतरले. बाकी चौघे जण किनाऱ्यावर मजा मस्ती करत होते. अचानक पाण्यात उतरलेल्या दोघांपैकी प्रणय देवमाने हा पाण्यात आंघोळ करता करता पुढे पुढे सरकला आणि पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. मात्र त्याच्या सोबत पाण्यात उतरलेला त्याचा मित्र पोहत पोहत पाण्याबाहेर आल्याने वाचला आहे.
शिरोडा समुद्रात पर्यटक बुडाल्याची माहिती मिळताच शिरोडा पोलीस दीपा मठकर व अन्य पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे. बुडालेल्या पर्यटकांचा शोध सुरू केला. मात्र उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नाही. दरम्यान आज बुधवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला आहे.













