IPL 2027 मधून पॅट कमिन्स माघार घेणार? ऑस्ट्रेलियन कर्णधाराचे मोठे संकेत

व्यस्त वेळापत्रकामुळे कमिन्सवर वाढला ताण
कसोटी क्रिकेट आणि विश्वचषकाला प्राधान्य देण्याची भूमिका

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने IPL 2027 मधून बाहेर राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियाच्या संघासमोर भारत दौरा, ॲशेस मालिका आणि एकदिवसीय विश्वचषक अशी अत्यंत व्यस्त मालिका असणार आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या कामाचा ताण नियंत्रित ठेवण्यासाठी काही स्पर्धांमध्ये तडजोड करावी लागू शकते, असे कमिन्सने सांगितले. त्याने स्पष्ट केले की कसोटी क्रिकेट आणि विश्वचषक हेच त्याचे सर्वोच्च प्राधान्य राहील. तसेच वेगवान गोलंदाजांच्या फिटनेस आणि वर्कलोड व्यवस्थापनावरही विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे त्याने नमूद केले.


मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने संकेत दिले आहेत की, वाढत्या कामाच्या ताणामुळे तो IPL 2027 मध्ये खेळण्याबाबत पुनर्विचार करू शकतो. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियन संघाला अत्यंत व्यस्त वेळापत्रकाचा सामना करावा लागणार असून त्याची सुरुवात भारताविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेने होणार आहे. त्यानंतर मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरील 150 व्या वर्धापन दिनाची कसोटी, ॲशेस मालिका आणि दक्षिण आफ्रिकेतील एकदिवसीय विश्वचषक अशी मोठी आव्हाने संघासमोर असतील.

द एज या ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राशी बोलताना कमिन्स म्हणाला की, पुढील वर्षी काही ना काही गोष्टींमध्ये तडजोड करावी लागेल. मात्र ती कसोटी सामने किंवा विश्वचषक असणार नाहीत. फ्रँचायझी क्रिकेटबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी संबंधित संघटनांशी चर्चा करून परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल, असेही त्याने स्पष्ट केले.

कमिन्सने सांगितले की, त्याच्यासाठी नेहमीच कसोटी क्रिकेट आणि एकदिवसीय विश्वचषक हे सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे. जर त्याने संपूर्ण भारत दौरा खेळला, तर ॲशेसपूर्वी स्वतःला ताजेतवाने ठेवण्यासाठी विश्रांती घेण्याची गरज भासू शकते, असेही त्याने नमूद केले.

33 वर्षीय कमिन्सला गेल्या काही वर्षांत दुखापतींचा सामना करावा लागला आहे. विशेषतः पाठीच्या समस्यांमुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत काही वेळा अडथळे आले. त्यामुळे जोश हेझलवूड आणि मिचेल स्टार्क यांच्यासह प्रमुख वेगवान गोलंदाजांच्या वर्कलोडचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचे त्याने सांगितले.

तो म्हणाला की, परिस्थितीनुसार काही गोलंदाजांना भारत मालिकेच्या उत्तरार्धात विश्रांती देण्याचाही विचार केला जाऊ शकतो. यामुळे त्यांना ॲशेस मालिकेपूर्वी अतिरिक्त विश्रांती मिळेल आणि ते अधिक ताजेतवाने राहतील.

व्यस्त वेळापत्रक असूनही कमिन्सला पुढील 18 महिने ऑस्ट्रेलियन संघासाठी अत्यंत महत्त्वाचे वाटतात. हा काळ आव्हानात्मक असला तरी भविष्यात मागे वळून पाहताना तो आपल्या कारकिर्दीतील सर्वात समाधानकारक कालखंडांपैकी एक ठरेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला.

दरम्यान, IPL 2026 मध्ये कमिन्सने सुरुवातीचे सात सामने गमावले होते. त्यानंतर तो सनरायझर्स हैदराबाद संघाच्या नेतृत्वासाठी परतला. त्याच्या अनुपस्थितीत इशान किशन याने कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली होती. कमिन्सच्या नेतृत्वाखाली संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश केला, मात्र एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून पराभव स्वीकारावा लागल्याने हैदराबादचा प्रवास संपुष्टात आला.