मुरगूड येथील तरुणीच्या अत्याचार प्रकरणी राधानगरी येथील चार तरुणांना अटक…

.राधानगरी तालुक्यात मोठी खळबळ…

प्रतिनिधी /रोहन कांबळे

 

राधानगरी :तालुक्यातील चार आरोपींविरुद्ध एका तरुणीने केलेल्या गंभीर तक्रारीमुळे मुरगुडसह राधानगरी तालुक्यात खळबळ उडाली आहे.फोटो व अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार आणि मानसिक छळ केल्याचा आरोप करत पीडित तरुणीने मुरगूड पोलीस ठाण्यात धाव घेतली.त्यानंतर पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची सुरुवातीला आदित्य बाजीराव शेटके (रा.खिंडी व्हरवडे, ता.राधानगरी) याच्याशी ओळख झाली होती.ओळखपत्र देण्याच्या बहाण्याने त्याने तरुणीला मुदाळ तिट्टा येथे बोलावून घेतले.त्यानंतर मुरगुड येथील तलाव परिसरातील झाडीमध्ये नेऊन तिचे फोटो काढले व ते एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर आरोपीने पीडितेची ओळख रणजीत संभाजी मुधोळकर (रा.सोळांकुर,ता.राधानगरी) याच्याशी ओळख करून दिली. फिर्यादीनुसार, विविध ठिकाणी तसेच लॉजमध्ये नेऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यात आले. यावेळी तिचे फोटो व व्हिडिओ काढून बदनामीची भीती दाखवण्यात आल्याची तक्रारीत नमूद आहे.

यानंतर प्रवणगिरी चंद्रशेखर पालकर (रा.राधानगरी ता.राधानगरी) याच्याशी ओळख करून देण्यात आली. त्याने सोशल मीडिया द्वारे संपर्क साधून एका लॉजमध्ये नेऊन अत्याचार केल्याचा आरोप आहे.तसेच विक्रम रामचंद्र पाटील (रा.बुजवडे, ता.राधानगरी) यानेही एका लॉज मध्ये नेऊन जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीनुसार मुरगूड तलाव परिसर, गिरगाव, कात्यायनी,सीबीएस कोल्हापूर परिसरातील लॉज तसेच अन्य ठिकाणी वेळोवेळी हा प्रकार घडला. प्रकरण मिटवून देण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आली. पैसे दिल्यानंतरही मोबाईलमधील फोटो व्हिडिओ डिलीट न करण्याचे धमक्या देत मानसिक छळ सुरूच ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

गेल्या सहा ते सात महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले असून अखेर त्रास असह्य झाल्यानंतर पिडित तरुणीने मुरगूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या गंभीर प्रकरणाची दखल घेत कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी मुरगूड पोलीस ठाण्याला भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. दरम्यान चारही आरोपींना कागल न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना ६ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील या करत आहेत.

या घटनेमुळे राधानगरी तालुक्यातील संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.