रत्नागिरी BREAKING: मध्यरात्री बंगल्याच्या आवारातील कारला भीषण आग; दुचाकीही जळून खाक

रत्नागिरी: प्रतिनिधी

रत्नागिरी शहरातील स्वरूपानंद नगरजवळील प्रशांत नगर परिसरात आज मध्यरात्रीच्या सुमारास एका बंगल्याच्या आवारात उभ्या असलेल्या कारला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत कारसह शेजारी उभी असलेली दुचाकीही जळून खाक झाली. सुदैवाने एमआयडीसी अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास प्रशांत नगर येथील सूरज संजय जाधव यांच्या बंगल्याच्या आवारात पार्क केलेल्या मारुती सुझुकी SX4 कारला अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. आगीची तीव्रता इतकी होती की कारच्या शेजारी उभी असलेली TVS Raider दुचाकीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी अग्निशमन दलाचे पथक अग्निशमन बंबासह घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे आग बंगल्यात किंवा परिसरातील अन्य मालमत्तेकडे पसरण्यापासून रोखण्यात यश आले.

या आगीत कार आणि दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

दरम्यान, कारला आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याबाबत अधिक तपास सुरू आहे.