कोकण विधान परिषद निवडणुक पाचही उमेदवारांचे अर्ज मागे
महाविकास आघाडीच्या बाळ मानेंसह एकूण सहा उमेदवारांपैकी चौघांचीही माघार
रत्नागिरी । अनघा निकम मगदूम
कोकण विधान परिषद निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट आला असून अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांच्यासह रिंगणातील उर्वरीत पाचही जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.


कोकण विधान परिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी सर्वात प्रथम शेकापचे उमेदवार अरविंद म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शिवसेना उबाठाचे उपनेते बाळ माने हे राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्यासह रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आले आणि त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. या घडामोडीमुळे संपूर्ण कोकणात एकच खळबळ उडाली.
तर उर्वरित उमेदवारांमध्ये शेकापच्या मानसी म्हात्रे आणि अपक्ष उमेदवार अनिल चोपडा यांनीही अर्ज मागे घेतले. तर बंडखोरीचे संकेत देणाऱ्या आ. महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनीही बुधवारी आपल्या उमेदवारी अर्ज मागे घेतला होता.


त्यामुळे रिंगणातील एकूण सहा पैकी पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत सुनील तटकरे यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


ही निवडणूक बिनविरोध होण्याचे संकेत काही दिवसांपूर्वी ना. नितेश राणे यांनी जाहीर मेळाव्यात दिले असतानाच ही घडामोड घडल्याने राजकीय विश्लेषकांमध्ये आणि कोकणात राजकीय गणिते बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.













