जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माणगाव येथे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जनजागृती

 

कुडाळ :    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वन परिमंडळ माणगाव अंतर्गत वासुदेवानंद सरस्वती हायस्कूल, माणगाव येथे पर्यावरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम मा. श्री. मिलिश शर्मा (उपवनसंरक्षक, वन विभाग सावंतवाडी), मा. श्री. सुनील लाड (सहायक वनसंरक्षक, सावंतवाडी) तसेच मा. श्री. चेतन पाटील (वनक्षेत्रपाल, कुडाळ) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.

यावेळी विद्यार्थी-विद्यार्थिनींना पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे महत्त्व, वनसंपदेचे जतन, वन्यजीवांचे संरक्षण तसेच पर्यावरणाची काळजी घेण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करण्याचे आवाहन केले.

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना ट्रॉफी प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच इतर सहभागी विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहन देण्यात आले.

या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री. पिळणकर, सावंत सर, वनपाल माणगाव, वनरक्षक माणगाव, वनमजूर, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण होऊन निसर्ग संरक्षणाचा संदेश प्रभावीपणे पोहोचला.